आगामी विधानसभा निवडणुकीत एसटी आरक्षण लागू करा !

मुख्यमंत्र्यांची मागणी : दिल्लीत मोदी-शहा यांच्याशी केली चर्चा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
41 mins ago
आगामी विधानसभा निवडणुकीत एसटी आरक्षण लागू करा !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदींची सहकुटुंब भेट घेतली.

पणजी : गोव्यात २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातीला (एसटी) आरक्षण लागू करण्यात यावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात केल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान गोव्याचा विकास आणि विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यातील विधानसभेत एसटी समाजाला आरक्षणाची तरतूद असलेले विधेयक संसदेत मंजूर होऊन त्याचा कायदा तयार झाला आहे. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राकडून अधिसूचना जारी होणे गरजेचे आहे.
केंद्राने अधिसूचना जारी केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग मतदारसंघ आरक्षित करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करेल. २०११ नंतर देशात अद्याप जनगणना झालेली नाही. सध्या केवळ घरांच्या जनगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून, पुढील वर्षी प्रत्यक्ष जनगणना होणार आहे. मात्र, आगामी निवडणूक पाहता २०११ च्या जनगणनेच्या आधारेच गोव्यात एसटी समाजाला विधानसभेत आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या प्रेरणा दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकीत एसटी समाजाला आरक्षण मिळेल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर झालेली ही दिल्ली भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.गोवा आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. या समुद्रकिनाऱ्यांवर जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उभारण्यासोबतच गोव्यातील नद्यांचा जलवाहतुकीसाठी योग्य प्रमाणात वापर करण्याबाबत केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी स्वतः एक्स (ट्विटर) वर पोस्ट करून या भेटीची माहिती दिली.
पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्लीला रवाना झाले होते. बुधवारी त्यांनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट प्रामुख्याने कौटुंबिक आणि वैयक्तिक स्वरूपाची होती. यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रात्री उशिरा केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेऊन गोव्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’च्या आंदोलनाची दखल
* येत्या विधानसभा निवडणुकीत एसटी आरक्षण लागू व्हावे, यासाठी ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’ या संघटनेने गोव्यात धरणे आंदोलन केले होते.

* आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संघटनांनी आपले आंदोलन मागे घेतले होते.

* मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती, त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत हा विषय लावून धरला आहे.