शिर्ली येथील हिट-अँड-रन प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद

थार चालक अटकेत : महिलेला धडक देऊन केले पलायन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
36 mins ago
शिर्ली येथील हिट-अँड-रन प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद

मडगाव : मडगाव पोलिसांनी शिर्ली येथील हिट अँड रन प्रकरणी महाराष्ट्रातील पुणे येथील स्वराज जगताप या ‘रेंट-अ-कार’ चालकाला अटक करण्यात आली. या घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी संशयितावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर सिर्ली परिसरात मंगळवारी रेंट अ कारने दुचाकीस्वार महिलेला धडक देत पळ काढला होता. एका कारच्या कॅमेरातील फुटेजमधून ही घटना समोर आली. थार या रेट अ कारने भरधाव वेगाने येत चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करत असताना समोर जाणाऱ्या दुचाकीस्वार महिलेला धडक दिली. अपघात झाल्यानंतरही चालकाने गाडी न थांबवता त्याच वेगाने पुढे जात पळ काढला. या घटनेची माहिती मडगाव पोलिसांना मिळताच तत्काळ सदर थार गाडीचा शोध सुरू करण्यात आला. मडगाव पोलिसांकडून वेर्णा, कुंकळ्ळी, मायना कुडतरी, फातोर्डा यांसह कळंगुट भागातील पोलिसांनाही या घटनेची माहिती देत कारचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. पोलिसांनी कारचा डॅश कॅम व सीसीटीव्ही फुटेजवरून गाडीची ओळख पटवून सदर गाडी चालवत असणाऱ्या पुणे येथील चालकाला कळंगुट येथून ताब्यात घेतले. दरम्यान जखमी महिला निविया गोम्स (४४) यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. त्यांच्या शरीराच्या विविध भागांवर फ्रॅक्चर्स असून, सध्या सर्जरी सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
पुण्यातील चालकाला अटक
चौकशीनंतर स्वराज जगताप (१९, रा. पुणे) याला मडगाव पोलिसांनी अटक केली. चुकीच्या बाजूने वाहन चालवत अपघात घडवून आणणे तसेच अपघातानंतर जखमी महिलेला वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी कोणताही प्रयत्न न केल्याने त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.