‘इनफ इज इनफ’ची सभा व्हर्च्युअल पद्धतीने

३० मे रोजी आयोजन : सभेची लिंक लवकरच करणार जारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
46 mins ago
‘इनफ इज इनफ’ची सभा व्हर्च्युअल पद्धतीने

पत्रकार परिषदेत बोलताना गोविंद शिरोडकर. सोबत देविदास आमोणकर व एल्विस गोम्स.

पणजी : पणजी महापालिकेने ‘इनफ इज इनफ’च्या बैठकीची परवानगी ऐनवेळी मागे घेतली. सरकारच्या या निर्णयाचा ‘इनफ इज इनफ’तर्फे निषेध करण्यात आला. या विरोधात बुधवारी ‘इनफ इज इनफ’च्या कोअर समितीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत सभा ३० मे रोजीच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभा व्हर्च्यूअल पद्धतीने घेण्यात येणार आहे. या सभेची लिंक लवकरच जारी केली जाणार आहे. व्हर्च्यूअल सभेमध्ये न्या. फर्दिन रिबेलो गोव्यसंबंधित विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत.
तत्पूर्वी बुधवारी ‘इनफ इज इनफ’तर्फे पणजीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देविदास आमोणकर, एल्विस गोम्स आणि गोविंद शिरोडकर उपस्थित होते. आमोणकर यांनी सांगितले की, महापालिकेने २१ मे रोजी परवानगी दिल्यावर आम्ही पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य परवाने देखील घेतले होते. सभेची पूर्वतयारी नियोजन सुरू झाले होते. मात्र २५ मे रोजी महापालिकेकडून अचानक परवानगी मागे घेण्यात आली.
३० मे रोजी आझाद मैदान येथे घटक राज्य दिनानिमित्त प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे कारण महापालिकेकडून देण्यात आले आहे. यावर प्रश्न उपस्थित करत आमोणकर म्हणाले की, महापालिकेला याबाबत आधीपासून माहिती नव्हती का? माहिती होती, तर सुरुवातीलाच परवानगी का देण्यात आली, याचे स्पष्टीकरण द्यावे.
गोव्यात आता पोर्तुगीज शासन नसले, तरी सध्याचे सरकार पोर्तुगीजांप्रमाणे हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याची टीका करत, परवाना मागे घेण्याची कृती पूर्णपणे लोकशाहीविरोधी असल्याचे ‘इनफ इज इनफ’तर्फे सांगण्यात आले.

चळवळीच्या वाढत्या पाठिंब्याची सरकारला भीती
मागील काही दिवसांत ‘इनफ इज इनफ’ चळवळीला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचा दावा करत, या लोकप्रियतेमुळे सरकार उघडे पडेल, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला. या चळवळीला घाबरूनच राज्य सरकारने ऐनवेळी परवानगी रद्द केली, आम्ही सरकारच्या या कृतीचा निषेध करतो, असेही ते म्हणाले.