मडगावच्या ‘ईएसआय’मध्ये लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांचे आश्वासन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th May, 11:16 pm

मडगाव येथील ईएसआय रुग्णालयात लवकरच नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. गोवा सरकारची ही महत्त्वपूर्ण मागणी तातडीने पूर्ण केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय कामगार, रोजगार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी दिले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री मांडविया यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली.

दिल्ली दौऱ्यात आरोग्य सुविधांवर चर्चा

मंगळवारी रात्री दिल्ली दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे विविध केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटींनंतर सायंकाळी त्यांनी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन गोव्यातील आरोग्य सुविधांच्या विस्तारावर चर्चा केली.

राज्यातील डॉक्टरांची कमतरता दूर होणार

गोव्यात सध्या आरोग्य सेवांचा वेगाने विस्तार होत आहे. राज्यातील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी आणि आणखी एका वैद्यकीय महाविद्यालयाची गरज लक्षात घेऊन मडगाव येथील ईएसआय रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरू होणार आहे.

एसटी आरक्षणावर गृहमंत्र्यांसोबत चर्चा

दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. या बैठकीत गोव्याच्या विधानसभेत अनुसूचित जमाती समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेविषयी तसेच पुढील आवश्यक कायदेशीर कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

वैद्यकीय महाविद्यालयाबाबत महत्त्वाच्या बाबी
  • नवीन वैद्यकीय महाविद्यालयातील ५० टक्के जागा गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील.
  • महाविद्यालय सुरुवातीला १०० खाटांच्या क्षमतेने सुरू होईल आणि पुढे ती क्षमता २५० खाटांपर्यंत वाढवली जाईल.
  • महाविद्यालयाचे व्यवस्थापन ईएसआयकडून केले जाणार असून राज्य सरकारकडे पूर्ण नियंत्रण राहणार नाही.
  • विद्यमान ईएसआय रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी राज्य सरकार अतिरिक्त जमीन देण्यास तयार आहे.
  • पूर्वी गोव्यात ‘एम्स’ आणि ईएसआय दोन्ही आणण्याचा विचार होता; मात्र केंद्र सरकारने एम्स योजना स्थगित केल्याने आता ईएसआय प्रकल्पावर भर दिला जात आहे.
  • दक्षिण गोव्यातील रुग्णांना बांबोळीतील जीएमसी रुग्णालयापर्यंत जाण्याचा त्रास कमी करण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाचे ठरणार आहे.