परवानगी असो वा नसो, पावसाळ्यानंतर आझाद मैदानावर सभा घेणारच

निवृत्त न्या. फेर्दीन रिबेलो यांचा इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th May, 09:43 pm
परवानगी असो वा नसो, पावसाळ्यानंतर आझाद मैदानावर सभा घेणारच

आपले मतभेद विसरून सर्वांनी ‘इनफ इज इनफ’ या चळवळीला पाठिंबा द्यावा. पावसाळ्यानंतर आम्ही आझाद मैदानावर सभा घेणार आहोत. परवानगी असली किंवा नसली तरी ही सभा होईलच आणि आता आम्ही मागे हटणार नाही, असे निवृत्त न्या. फेर्दीन रिबेलो यांनी स्पष्ट केले.

सरकार चळवळीला घाबरल्याचा आरोप

राज्य सरकार ‘इनफ इज इनफ’ चळवळीला घाबरले आहे. म्हणूनच चळवळीच्या सभेला देण्यात आलेली परवानगी ऐनवेळी मागे घेण्यात आली. असे असले तरी गोव्याची संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी आमची चळवळ सुरूच राहणार आहे, असे निवृत्त न्या. फर्दीन रिबेलो यांनी शनिवारी ऑनलाईन पद्धतीने जनतेशी संवाद साधताना सांगितले.

पावसाळ्यानंतर आझाद मैदानावर सभा घेतली जाईल. परवानगी असो वा नसो, आम्ही आता मागे हटणार नाही.
— निवृत्त न्या. फेर्दीन रिबेलो

पर्यावरण संरक्षणासाठी विधेयकाचा आग्रह

गोव्यातील पर्यावरण राखण्यासाठी आम्ही एक विधेयक तयार करून ते विरोधी पक्षांना दिले होते. मात्र विधानसभा अधिवेशनाचा कालावधी कमी झाल्याने त्यावर चर्चा होऊ शकली नाही. आज प्रत्येक राजकीय पक्षाने तसेच आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या विधेयकावर चर्चा करण्याची मागणी करावी, असे फेर्दीन रिबेलो यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्याची मागणी

लोकांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्याची मागणीदेखील करण्यात यावी. विकासाचा फायदा स्थानिकांना झाला पाहिजे. विकास प्रक्रियेतून स्थानिकांना रोजगार आणि इतर संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यपालांचा संदेश सरकारपर्यंत पोहोचावा

शनिवारी घटक राज्य दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील नद्या, डोंगर, समुद्रकिनारे आणि गावे जपून ठेवली पाहिजेत, असा संदेश दिला होता. हा संदेश सरकारपर्यंत पोहोचेल आणि त्यावर योग्य कृती होईल, अशी अपेक्षा असल्याचे निवृत्त न्या. फेर्दीन रिबेलो यांनी सांगितले.