गोव्याला ध्वनी प्रदूषण, सीआरझेड नियमांतून सूट द्या!

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंती : रेती उपशाचाही मुद्दा चर्चेत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th May, 11:12 pm
गोव्याला ध्वनी प्रदूषण, सीआरझेड नियमांतून सूट द्या!

गोवा हे पर्यटनासह पसंतीचे वेडिंग डेस्टिनेशन राहावे, यासाठी राज्याला ध्वनी प्रदूषण नियमांत सूट मिळण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच नद्यांमधील रेती उपसा शक्य व्हावा, यासाठी सीआरझेड नियम गोव्यासाठी शिथिल करण्याची विनंतीही त्यांनी केली असून, यावर कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दिल्ली भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती

पंतप्रधानांसह इतर केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी मंगळवारी रात्री दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गुरुवारी सायंकाळी गोव्यात परतले. गोव्यात परतल्यानंतर त्यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली. गोवा हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून आता त्याची ओळख वेडिंग डेस्टिनेशन म्हणूनही निर्माण होत आहे.

ध्वनी प्रदूषण नियमांमुळे विवाह समारंभांवर परिणाम

ध्वनी प्रदूषण नियमांमुळे गोव्यात रात्रीच्या वेळी संगीत वाजविण्यावर निर्बंध असल्याने लग्नसमारंभ व पार्ट्यांमध्ये पर्यटकांना मनमुराद आनंद घेता येत नाही. परिणामी, लग्नसमारंभांचे प्रमाण कमी होऊन अनेक जण विदेशातील ठिकाणांना पसंती देत आहेत. हे टाळण्यासाठी ध्वनी प्रदूषण नियमांत गोव्याला सवलत देण्याची मागणी करण्यात आली असून, याविषयी विविध खात्यांमध्ये समन्वय साधून पाठपुरावा करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

रेती उपशासाठी सीआरझेडमध्ये शिथिलतेची मागणी

गोव्यात मुबलक रेती असूनही सीआरझेड नियमांतील निर्बंधांमुळे तिचा उपसा करता येत नाही. रेती उपशावर बंदी असल्याने बांधकाम व्यावसायिकांना फटका बसत असून बाहेरून महागडी रेती आणावी लागत असल्याने घर बांधण्याचा खर्च वाढला आहे. या समस्येवर उपाय म्हणून सीआरझेड नियमांमध्ये गोव्यासाठी शिथिलता आणण्याची मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली. या विषयावर विविध खात्यांशी समन्वय साधून तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पंतप्रधानांचा गोवा दौरा

पर्वरी फ्लायओव्हरचे काम सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून, या फ्लायओव्हरसह कुणबी व्हिलेज आणि इतर प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये गोव्याला भेट देणार आहेत. या दौऱ्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले असून त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजनही होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गोव्यातील राजकीय स्थिती आणि विकासकामांवर चर्चा झाली.
  • राज्यात एसटी आरक्षणाची कार्यवाही लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
  • प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या स्थितीवरही चर्चा झाली.
  • गोव्यातील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन गोव्यात येणार आहेत.
लवकरच नव्या मंत्र्याचा शपथविधी

माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे राज्य मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर लवकरच नव्या मंत्र्याचा शपथविधी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पंतप्रधानांसोबत कुटुंबाची भेट

बुधवारी कुटुंबासह सेवा तीर्थ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी कुटुंबीयांशी सुमारे २५ मिनिटे चर्चा केली. जनसंघामार्फत सामाजिक कार्य सुरू केल्यापासून १९७८ मधील निवडणुकीपर्यंतच्या आठवणी वडिलांनी पंतप्रधानांना सांगितल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.