गिरीशा चोडणकरना धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

प्रदेशाध्यक्षपदावरील बदलानंतर नाराजी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th May, 09:37 pm
गिरीशा चोडणकरना धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

अमित पाटकर यांना पदावरून हटवून गिरीश चोडणकर यांच्याकडे गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपविल्यानंतर पक्षात नाराजीचे पडसाद उमटू लागले आहेत. या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसच्या पाच पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.

नियुक्तीनंतर राजीनाम्यांची मालिका

शुक्रवारी गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून हायकमांडकडून नियुक्ती जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे मीडिया प्रभारी दिव्य कुमार यांनी आपला राजीनामा सादर केला. आपण वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पक्ष नेतृत्वाने चुकीचा निर्णय घेतल्यामुळे आपण पद सोडत आहोत, असे शमीला सिद्दीकी यांनी राजीनामा जाहीर करताना सांगितले.

पदाधिकाऱ्यांचा उघड विरोध

शनिवारी काँग्रेसचे पदाधिकारी विशाल वळवईकर आणि सई वळवईकर यांनीही पदाचा राजीनामा देत या निर्णयाला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. अमित पाटकर यांना पदावरून दूर करताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, असे काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषा उसगावकर यांनी आपला राजीनामा देताना म्हटले आहे.

प्रदेशाध्यक्ष पदावरून अमित पाटकर यांना काढून टाकताना पक्षाने माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही किंवा विश्वासात घेतले नाही. अधिकृत पत्रक आल्यानंतरच मला याची माहिती मिळाली. काँग्रेसमध्ये खासदारालाही किंमत नाही.
— कॅ. विरियातो फर्नांडिस, खासदार
पाच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

गिरीश चोडणकर यांच्या नियुक्तीनंतर मीडिया प्रभारी दिव्य कुमार, शमीला सिद्दीकी, विशाल वळवईकर, सई वळवईकर आणि काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषा उसगावकर यांनी आपल्या पदांचे राजीनामे सादर केले आहेत. या घडामोडींमुळे प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

नव्या अध्यक्षांची समेटाची भूमिका

या राजीनाम्यांबाबत प्रतिक्रिया देताना गोवा प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

दोन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. अंतर्गत कारणांमुळे हे निर्णय घेतले असावेत. यामागील नेमके कारण काय आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पुढील दोन दिवसांत त्यांची भेट घेऊन नेमका विषय समजून घेतला जाईल आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.
— गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, गोवा काँग्रेस