रेवोडा येथे गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
42 mins ago
रेवोडा येथे गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

म्हापसा : मानशेर-रेवोडा येथे गव्याच्या हल्ल्यात सिंथिया फर्नांडिस (४५) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज रविवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. सिंथिया फर्नांडिस या नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन घराबाहेर पडल्या होत्या. याच वेळी पाठीमागून आलेल्या एका गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. गव्याने पाठीवर शिंग मारल्याने त्या जखमी होवून रस्त्यावर कोसळल्या.

या अनपेक्षित हल्ल्यानंतर सिंथिया यांच्या पाळीव कुत्र्‍याने जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली. कुत्र्याचा आवाज ऐकून घरातील व परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत गव्याला तेथून हाकलून लावले. त्यानंतर कुटुंबीयांनी जखमी सिंथिया यांना तात्काळ म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गव्याचे शिंग लागल्याने त्यांच्या पाठीवर खोल जखम झाली असून, रस्त्यावर पडल्यामुळे पायालाही दुखापत झाली आहे.

राज्यातील जंगले झपाट्याने नष्ट होत असल्यामुळे वन्य प्राणी आता मानवी वस्त्यांकडे वळू लागले आहेत. परिणामी, अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज सुदैवाने माझी आई या हल्ल्यातून बचावली. मात्र, सरकारने भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी वन्य प्राण्यांचा लोकवस्तीतील वावर रोखण्याकरिता तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जखमी सिंथिया यांचा मुलगा हेडन फर्नांडिस याने केली आहे.

हेही वाचा