मुस्लिमवाडा-भोमा येथे भाड्याने राहणाऱ्यांची पंचायत घेणार झाडाझडती

ग्रामसभेत ठराव : स्थलांतरितांकडून गैरकृत्ये घडत असल्याचा आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st May, 11:42 pm
मुस्लिमवाडा-भोमा येथे भाड्याने राहणाऱ्यांची पंचायत घेणार झाडाझडती

फोंडा : मुस्लिमवाडा-भोमा येथे भाड्याच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या काही संशयित व्यक्तींकडून ड्रग्ज, अमली पदार्थांचे सेवन, रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला दारू पिणे यांसह विविध गंभीर गैरकृत्ये घडत असल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारांमुळे भोमा गावचे नाव बदनाम होत असून, परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि पंचायत मंडळाने संयुक्तपणे सर्व भाड्याच्या खोल्यांची कडक पाहणी व तपासणी करावी, असा महत्त्वपूर्ण ठराव रविवारी झालेल्या भोम-अडकोण पंचायतीच्या ग्रामसभेत एकमताने संमत करण्यात आला.
सरपंच काही वैयक्तिक कारणास्तव या सभेला उपस्थित राहू शकले नसल्याने, पंच सदस्य दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. या वेळी अन्य पंच सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मुस्लिमवाडा येथील भाड्याच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या काही घटकांमुळे स्थानिक महिलांची सुरक्षा आणि तरुणांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. यावर उत्तर देताना अध्यक्ष दामोदर नाईक यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले की, पंचायतीतर्फे स्थानिक पोलिसांना तातडीने अधिकृत पत्र दिले जाईल आणि संपूर्ण परिसरातील भाड्याच्या खोल्यांची सखोल तपासणी केली जाईल. काही वर्षांपूर्वी याच भागातून पोलिसांनी काही बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी अटक केली होती, याची पंचायतीला नोंद आहे. त्यामुळे स्थानिक लोकांची बदनामी थांबवण्यासाठी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर उपाययोजना केल्या जातील.
या ग्रामसभेत बाणास्तारी येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित जेटीला स्थानिक नागरिकांनी प्रचंड गोधळ घालत तीव्र विरोध दर्शवला. या प्रकल्पाविषयी स्पष्टीकरण देताना दामोदर नाईक यांनी सांगितले की, जेटी उभारणीसाठी पंचायत कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच, राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या प्रश्नासंबंधी सरकारकडून पंचायतीला अजूनही कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. मात्र, पंचायत मंडळ पूर्णपणे जनतेच्या पाठीशी उभे असून, या विषयावर सरकारशी पुन्हा एकदा आक्रमकपणे पत्रव्यवहार करण्याचा ठराव या वेळी घेण्यात आला.
वाढीव घरपट्टी अखेर कमी होणार
पंचायत क्षेत्रात करण्यात आलेल्या घरपट्टीच्या दरवाढीवरही ग्रामस्थांनी कडाडून टीका केली. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता सर्वसामान्यांच्या सोयीनुसार आणि परवडेल अशीच घरपट्टी आकारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली. जनतेच्या या मागणीचा आदर करत, पंचायतीने वाढवलेले घरपट्टीचे दर कमी करण्याचा कायदेशीर ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला, ज्यामुळे करदात्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा