चर्चिल आलेमाव : नावेलीतून वालंका लढणार

फोटो : चर्चिल आलेमाव
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : काँग्रेस पक्ष हा चांगला पक्ष असल्याची माझे वैयक्तिक मत आहे. आपण काँग्रेसकडे तिकीट मागत नाही; पण काँग्रेसने तिकीट दिल्यास नक्कीच त्याचा स्वीकार केला जाईल. लोक आपणासोबत नेहमीच आहेत. इतकी वर्षे काँग्रेसने आपणास दूर ठेवल्याने पक्षापासून दूर होतो, काँग्रेसने जवळ केल्यास जवळ राहू, असे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.
आगामी निवडणुकांबाबत चर्चिल यांनी सांगितले की, बाणावली मतदारसंघातून मी निवडणूक लढणार, तर नावेली मतदारसंघातून वालंका आलेमाव निवडणूक लढवतील. आता आपली तब्येत चांगली असल्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस हा सागर असून त्यात अनेकदा लाटा येतात व जातात. काँग्रेस पक्ष कधीही संपुष्टात येणार नाही. या निवडणुकीत लोकांचा काँग्रेसला पाठिंबा मिळू शकतो, अशी सध्याची परिस्थिती आहे. काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना राजकारणाचा खूप अनुभव आहे. राजकारणात इकडे तिकडे जाणे होतच असते, घरातील वातावरण चांगले नसल्यास तसे होत राहते. आताचे आमदार आहेत, ते नवीन आहेत. चांगल्या उमेदवारांना तिकीट दिल्यास काँग्रेसचे २१ का २५ उमेदवारही निवडून येऊ शकतात. राज्याबाहेरून येणार्या निरीक्षकांना स्थानिकांकडून माहिती दिली जात असते.
बाणावलीतून निवडणूक लढण्याचा विचार : डिक्सन
केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीत बाणावली मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार असल्याचे सांगितले. सरपंच म्हणून काम करताना प्रशासकीय कामांचा अनुभव असून युवावर्गासाठी अनेक योजना आहेत. लोक कामाच्या जोरावर माझी निवड करतील, असा विश्वास व्यक्त केला. मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून २०२२ मध्ये गिरीश चोडणकर व दिगंबर कामत यांनी उमेदवारी घेण्यास सांगितले होते; पण त्यावेळी आपली तयारी नव्हती. निवडणुकीपूर्वी लोकांशी चर्चा करून योग्य पर्याय निवडण्यात येईल, असेही वाझ यांनी स्पष्ट केले.