पक्षहितासाठी हायकमांडचा निर्णय स्वीकारला : फ्रान्सिस सार्दिन

काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी हायकमांडचा आदेश कार्यकर्ता म्हणून पाळणार असल्याचे स्पष्टीकरण.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
37 mins ago
पक्षहितासाठी हायकमांडचा निर्णय स्वीकारला : फ्रान्सिस सार्दिन

मडगाव : काँग्रेस पक्ष कोणाच्या एकाच्या बापाचा नसून तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. वैयक्तिक पातळीवर मला काय वाटते, याने कोणताही फरक पडत नाही. पक्षाच्या हायकमांडने घेतलेला निर्णय एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता म्हणून स्वीकारणे आवश्यक असून, केवळ पक्षहितासाठीच आपण तो स्वीकारला आहे. आगामी काळात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आपण जोमाने काम करणार आहोत, असे ठाम मत माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी व्यक्त केले.

काँग्रेस पक्षातील अंतर्गत अध्यक्षबदलाच्या घडामोडींबाबत बोलताना माजी खासदार सार्दिन यांनी सांगितले की, अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करायची, याचा अंतिम अधिकार हा पक्षाच्या केंद्रीय वरिष्ठ नेत्यांचा असतो. तो आदेश आपणास आवडला किंवा नाही, तरी पक्षाची शिस्त म्हणून तो मानणे गरजेचे असते. यापूर्वी जेव्हा आपली पक्षाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती, त्यावेळीही कोणतीही पूर्वविचारणा झाली नव्हती आणि आताही नवीन बदलांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु, पक्ष हा कोणा एका व्यक्तीच्या मालकीचा नसल्याने, तो सगळ्यांचा आहे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत व्हावी, अशीच आमची प्रामाणिक इच्छा आहे.

प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित समितीत समन्वय समितीच्या अध्यक्षपदी सार्दिन यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, मला हे पद मिळाल्याची माहिती मिळाली असली, तरी नेमके कामाचे स्वरूप काय असणार, हे लवकरच स्पष्ट होईल; सध्यातरी मला त्याची सविस्तर माहिती नाही. हे पद देण्यापूर्वी माझ्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नव्हती. मात्र, काँग्रेस पक्षासाठी कोण काय करू शकते, याची वरिष्ठांना पूर्ण जाणीव असल्यानेच माझ्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे जे पद दिले आहे, ते स्वीकारून काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन.

पक्षात समन्वय साधताना आपणास अध्यक्षांच्या कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता भासणार नाही, असे सांगत सार्दिन पुढे म्हणाले की, आम्हाला आवडले किंवा नाही तरी गिरीश चोडणकर यांना पक्षाने अध्यक्ष केले आहे, त्यामुळे त्यांचा आदर करणे आणि तो निर्णय स्वीकारणे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. पक्षात केवळ 'हो ला हो' देणारे बैल नसून, लोकशाही मार्गाने सर्व कार्यकर्त्यांच्या मताला किंमत दिली जाईल.

यापूर्वी आपण खासदार पदावर कार्यरत असल्याने पक्षाच्या अंतर्गत निर्णयांवर उघडपणे भाष्य करता येत नव्हते, परंतु आता पक्षाच्या हितासाठी आम्ही आमचे विचार ठामपणे मांडणार आहोत. काँग्रेससाठी काय चांगले आणि काय वाईट, तसेच निवडणुका कशा जिंकता येतात, याचा प्रदीर्घ अनुभव ज्येष्ठ नेता म्हणून पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत काँग्रेस किती जागा जिंकणार, हे केवळ निकालाच्या दिवशी मतमोजणीनंतरच समजेल, असे सांगत सार्दिन यांनी जागांचा आकडा जाहीर करण्याचे टाळले. सध्या भाजप राज्यात चांगल्या स्थितीत आहे की नाही, हे येणारा काळच ठरवेल; आम्ही केवळ काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी काम करत राहू, असे सांगत त्यांनी निवडणुकीच्या तीन महिन्यांपूर्वी राजकीय स्थितीवर सविस्तर भाष्य करणार असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा