जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वीच झाला होता अध्यक्ष बदलाचा निर्णय : माणिकराव ठाकरे

म्हणाले-पक्षातील अंतर्गत वाद मिटवून संघटना पुन्हा बळकट करू; पाटकर आणि कॅप्टन विरियातोंशी करणार चर्चा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 mins ago
जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वीच झाला होता अध्यक्ष बदलाचा निर्णय : माणिकराव ठाकरे

पणजी : डिसेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वीच गोव्याचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला होता. गोव्यातील मुख्य नेत्यांना याची पूर्ण कल्पना होती. बंगळुरू येथे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत याविषयी सविस्तर चर्चाही झाली होती. आता मी स्वतः अमित पाटकर आणि विरियातो फर्नांडिस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. पक्षात जर कोणी नाराज असेल, तर त्यांची नाराजी दूर करण्यात आम्हाला नक्कीच यश येईल," असे काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

अमित पाटकर यांना पदावरून हटवून गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर गोव्यातील काँग्रेसमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे सांगत तीव्र संताप व्यक्त केला आहे. याशिवाय मनीषा उजगावकर, रणजितसिंग राणे आणि डिचोली गटाचे अध्यक्ष दत्ताराम शेट्ये यांनीही आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. पक्षात राजीनाम्यांची मालिका सुरूच असताना, पक्षाकडून सर्व नाराज नेत्यांची समजूत काढली जाईल, असे माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वी बंगळुरू येथे बऱ्याच नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. त्यावेळी खर्गे यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल, असे स्पष्ट संकेत दिले होते आणि त्याप्रमाणेच आता अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. हा हायकमांडने घेतलेला निर्णय आहे. मी येत्या दोन दिवसांत गोव्यात येत असून कॅप्टन विरियातो फर्नांडिस, अमित पाटकर तसेच इतर नेत्यांशी बैठक होणार आहे. निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्यापूर्वी खासदार विरियातो फर्नांडिस यांना कल्पना दिली गेली नव्हती ही गोष्ट खरी असली, तरी पक्षात सर्वांनाच या संभाव्य निर्णयाची पूर्ण कल्पना होती, असेही माणिकराव ठाकरे यांनी पुढे सांगितले.


हेही वाचा