मासेमारी हंगाम आजपासून संपुष्टात; खारीवाडा जेटीवर शुकशुकाट

यंदाचा हंगाम समाधानकारक : मात्र कामगारांची टंचाई, डिझेलच्या वाढत्या दरामुळे मच्छिमार चिंतेत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st May, 11:53 pm
मासेमारी हंगाम आजपासून संपुष्टात; खारीवाडा जेटीवर शुकशुकाट

वास्को : वार्षिक मासेमारी हंगाम सोमवारपासून (१ जून) अधिकृतपणे संपत असल्याने वास्को येथील ऐतिहासिक खारीवाडा फिशिंग जेटीवरील बोटमालक आणि कामगारांची गेल्या काही दिवसांची धावपळ आता पूर्णपणे थंड झाली आहे. पावसाळा सुरू होत असल्याने पुढील दोन महिन्यांसाठी समुद्रातील मासेमारीवर कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, बहुतांश बोटी आधीच धक्क्यावर उभ्या करण्यात आल्या असून, रविवारी सकाळी काही मोजकेच बोट मालक व कामगार बोटीतील जाळी आणि इतर साहित्य वाहनांतून सुरक्षित स्थळी हलवताना दिसत होते. जेटीवरील बहुतांश परप्रांतीय कामगार आपापल्या गावी रवाना झाल्याने खारीवाडा जेटीवर आता पूर्णपणे सामसूम झाली आहे.
दरम्यान, यंदाचा मासेमारी हंगाम बऱ्यापैकी चांगला गेला असून बोटमालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती गोवा फिशिंग बोट ओनर असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी दिली. मात्र, त्याच वेळी त्यांनी मच्छिमारांच्या प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
हंगामाविषयी बोलताना जुझे फिलिप डिसोझा म्हणाले, आम्ही सरकारी अधिसूचनेचे तंतोतंत पालन करून दोन महिने मासेमारी पूर्णपणे बंद ठेवणार आहोत. यंदाच्या हंगामात समुद्राने आम्हाला चांगली साथ दिली. तारले, बांगडे तसेच इतर मासे अपेक्षित प्रमाणात मिळाल्याने हा हंगाम मच्छिमारांसाठी आर्थिकदृष्ट्या समाधानकारक ठरला. येणारा नवा हंगामही असाच चांगला जावो, हीच प्रार्थना आहे.
हंगाम चांगला गेला असला तरी मच्छिमारांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. डिसाेझा यांनी सांगितले की, सध्या गोव्यात मासेमारीसाठी स्थानिक व परप्रांतीय कामगार मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. कामगारांच्या टंचाईमुळे काही बोटमालकांना संपूर्ण हंगामभर आपल्या बोटी धक्क्यावरच बांधून ठेवाव्या लागल्या होत्या.
तसेच, खोल समुद्रात मासेमारीसाठी जाताना बोटींना सलग १० ते १५ दिवस समुद्रात राहावे लागते. यासाठी एका फेरीला सुमारे ६ हजार लीटर डिझेल, मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी, बर्फ आणि इतर जीवनावश्यक वस्तू न्याव्या लागतात. मासेमारी दरम्यान बोटीचे इंजिन सतत चालू ठेवावे लागत असल्याने डिझेलचा खर्च प्रचंड येतो. अशा परिस्थितीत अनेकदा जाळ्यात मासे सापडत नाहीत, ज्यामुळे बोटमालकांना एकाच फेरीत लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.
डिझेल व्हॅट अनुदानाच्या थकबाकीची मागणी
डिझेलवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने सरकारने फिशिंग बोट मालकांना भरीव अनुदान देण्याची गरज आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक सारख्या शेजारील राज्यांमध्ये मच्छिमार बांधवांना डिझेलवर संपूर्ण अनुदान दिले जाते, मात्र गोव्यात तशी स्थिती नाही. त्यातच सध्या डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. जर हीच परिस्थिती राहिली, तर पुढील हंगामात बोट मालकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहील, असा इशारा डिसोझा यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर भिस्त
गोव्यातील बोटमालकांना सन २०२२ आणि २०२३ या वर्षांतील डिझेलवरील ‘व्हॅट’अनुदानाची थकबाकी रक्कम अद्याप मिळालेली नाही. ही रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकारात्मक आश्वासन दिले असून, ही थकबाकी लवकरच खात्यावर जमा होईल आणि मच्छिमारांना दिलासा मिळेल, अशी आशा जुझे फिलिप डिसोझा यांनी व्यक्त केली.
 

हेही वाचा