स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षावर टीका चुकीची

दीपक ढवळीकर यांचे उद्गार


30th May, 11:52 pm
स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षावर टीका चुकीची

प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : मगो हा बहुजनांचा पक्ष आहे. पक्षाने बहुजन समाजासाठी मोठे कार्य केले आहे. राज्यात सध्या भाजप व मगोची युती असून युतीचा धर्म पाळला जात आहे. मात्र स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षावर टीका करणे चुकीचे आहे, असे मत मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी व्यक्त केले.
मगो पक्ष काही मतदारसंघांत कार्यालय सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षांतर करू नये, या उद्देशाने कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप व मगो पक्षाच्या नेत्यांची बैठक होईल. त्या बैठकीत जागांबाबत चर्चा केल्यानंतर अधिक माहिती देण्यात येईल. मगोचे १४ मतदारसंघांत काम सुरू करून पक्ष बळकट करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे, असेही दीपक ढवळीकर यांनी सांगितले.
मगो युतीचा धर्म पाळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिरोडा, फोंडा व प्रियोळ मतदारसंघांतील कार्यकर्ते मला निवडणूक लढविण्याचा आग्रह करत आहेत. विधानसभा निवडणूक निश्चित लढविणार; पण अद्याप मतदारसंघ निश्चित झालेला नाही. भाजप व मगो युतीच्या निर्णयानंतर कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची याचा निर्णय घेण्यात येईल.
_ दीपक ढवळीकर, अध्यक्ष, मगो

हेही वाचा