सुरावलीत बैलाची बेकायदेशीरपणे कत्तल

कोलवा पोलिसांकडून दोघांना अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26 mins ago
सुरावलीत बैलाची बेकायदेशीरपणे कत्तल

मडगाव : सुरावली येथे बेकायदेशीरपणे बैलाची कत्तल केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी शुक्रवारी दोन संशयितांना अटक केली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मृत प्राण्याच्या अवशेषांची तपासणी करण्यात आली असून, कोलवा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलवा पोलीस स्थानकाचे कर्मचारी २९ मे रोजी परिसरात गस्त घालत होते. त्यादरम्यान, सुरावली येथील 'जोस काऊ शेड'नजीक एका बैलाची बेकायदेशीरपणे कत्तल केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन छापा टाकला. त्यावेळी दोघे बैलाची कत्तल करताना रंगेहात सापडले. कोलवा पोलिसांनी तत्काळ त्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून मृत जनावराच्या अवशेषांची रीतसर तपासणी करण्यात आली. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करून कत्तलीसाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि गोवा प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.

या कारवाईत पोलिसांनी संशयित दादापीर कलेगार (वय ३५, सध्या रा. सुकोभाट, मूळ कर्नाटक) आणि मोहम्मद उमर तारीन (वय २०, सध्या रा. फोंडा, मूळ कर्नाटक) या दोघांना रीतसर अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश महाले, पोलीस उपनिरीक्षक निखिल खाजणेकर, पोलीस कॉन्स्टेबल सत्यवान गावकर आणि नागेश कांबळे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा