वाढते अपघात, जाणारे बळी यासंदर्भात चिंता,असंतोष वाढला

पणजी : मळा, नेवगीनगर-पणजी येथे शनिवारी सकाळी चारचाकी वाहनाचा स्वयंअपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात वाहनचालक जखमी झाला असून; त्याला तातडीने उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) येथे दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा स्वयंअपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून; पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
वाढत्या अपघातांसंदर्भात चिंता
काल शुक्रवारी शिवोली येथे भरधाव थार जीपने चुकीच्या दिशेने जाऊन डिसो स्कूटरला धडक दिल्याने; संकेत दाभोळकर (३४ वर्षे) या दुचाकीस्वाराचे निधन झाले तर १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. थार चालक दारूच्या नशेत असल्याचा दावा करीत स्थानिक एकवटले होते व त्यांनी चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. संकेत दाभोळकर या युवकाच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करतानाचा वाढते अपघात व त्यात जाणारे बळी यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. तीन दिवसांपूर्वी शिर्ली, मडगाव येथे भरधाव थार वाहनाने चुकीच्या दिशेने जाऊन दुचाकीला धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
अपघात वाढले
दरम्यान, गोव्यात गेल्या आठवडाभरात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार २०२६ मध्ये राज्यातील अपघातांचे प्रमाण चिंताजनक राहिले असून; जानेवारी ते मे या कालावधीत अपघातांची संख्या वाढली आहे. अलीकडील अहवालानुसार चालकांच्या मृत्यूंमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे.
वाहतूक नियमांचे पालन न करता बेदरकारपणे वाहने चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे आणि निष्काळजीपणा याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
वाहनचालकांनी सतर्कता बाळगावी
आता पावसाळा जवळ येत असून, वाहनचालकांनी पावसाळ्यातील धोका ओळखून अधिक सावधगिरी बाळगावी, वेगमर्यादांचे पालन करावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.