तिलारी घाटात झुडपात आढळला ३५ वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
28 mins ago
तिलारी घाटात झुडपात आढळला ३५ वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह

दोडामार्ग : दोडामार्ग-बेळगाव-कोल्हापूर या तिन्ही शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या तिलारी घाटात एका ३५ वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. वीज निर्मिती जलवाहिनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या दाट झुडपात हा मृतदेह आढळून आला. महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच मृतदेह या निर्जन ठिकाणी टाकला असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

तिलारी विजनिर्मिती जलवाहिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून काही नागरिक जात असताना, त्यांना अचानक तीव्र कुजलेला वास आला. संशय आल्याने त्यांनी आजूबाजूच्या झाडीझुडपात शोध घेतला असता, त्यांना एक सडलेल्या अवस्थेतील मृतदेह निदर्शनास आला. या घटनेची माहिती तात्काळ चंदगड पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच चंदगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. तिच्या अंगावर मोरपिसी सोनेरी रंगाची साडी, लाल सोनेरी ब्लाऊज आणि पायात पैंजण आहेत. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने चेहऱ्यावरून ओळख पटवणे अत्यंत कठीण आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मृत महिला शेजारील कर्नाटक राज्यातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंदगड पोलिसांनी आपल्या हद्दीत तसेच शेजारील पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या काही दिवसांत बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सध्या पोलीस सर्व बाजूंनी तपास घेत आहेत. 

हेही वाचा