म्हणाले- केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोचविण्यावर भर

पणजी : सरकारी, खासगी व कोमुनिदादच्या जमिनींवरील घरे लोकांच्या नावावर करणाऱ्या 'माझे घर' योजनेअंतर्गत आणखी ३ हजार अर्ज निकालात काढण्यात आले आहेत. उत्तर व दक्षिण गोव्यात १० आणि ११ जून रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून या ३ हजार घरांच्या सनदांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोचविण्यासह केंद्रातील एनडीए सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यातील प्रत्येक मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पणजी येथे आज भाजप, मगोप आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध निर्णयांची माहिती दिली.
राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर होणार वृक्षारोपण
हरित कॉरिडॉर (Green Corridor) उपक्रमांतर्गत राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या बाजूला सुमारे १० लाख झाडांची रोपटी लावली जाणार आहेत. ५ जून ते ५ सप्टेंबर या कालावधीत हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविला जाईल.
एनडीए सरकारला १२ वर्षे पूर्ण; पंतप्रधानांचे अभिनंदन
केंद्रातील एनडीए सरकारला यशस्वी १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. या निमित्ताने गोव्यातील प्रत्येक मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात गोवा दौऱ्यावर येण्याची शक्यता असून, त्यांच्या हस्ते राज्यातील विविध विकासप्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल. सद्यस्थितीला सुरू असलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यावर सरकारचा भर असून बैठकीत या कामांचा आढावा घेण्यात आला.
रोजगार प्रशिक्षण आणि आरोग्य तपासणी
प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत आतापर्यंत १५०० तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले असून, आगामी काळात आणखी १५ हजार तरुणांना प्रशिक्षित केले जाईल. याशिवाय चेक्ड बाय दोतोर आणि 'हेल्थ विथ आयुर्वेदा' या उपक्रमांतर्गत पुन्हा एकदा राज्यभरात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिपदाबाबत बैठकीत चर्चा नाही
राज्यातील रिक्त मंत्रिपद कोणाला मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी आजच्या बैठकीत मंत्रिपदाबाबत कोणताही खल झाला नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. आमदार दिलायला लोबो यांनीही पत्रकारांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला.
विश्वजीत, मॉविन, दिगंबर कामत बैठकीला अनुपस्थित
ही बैठक सत्ताधारी मंत्री आणि आमदारांची असली, तरी काही प्रमुख मंत्र्यांची अनुपस्थिती लक्षणीय ठरली. आरोग्यमंत्री विश्वजित राणे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत आणि आमदार निलेश काब्राल या बैठकीला उपस्थित नव्हते. तर दुसरीकडे, मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार जीत आरोलकर यांच्यासह सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार अलेक्स रेजिनाल्ड, डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि आंतोन वाज बैठकीला उपस्थित होते.