पीएम जनधन योजनेतील १४ टक्के खात्यांत शून्य ‘धन’

एका वर्षात शून्य शिलकीच्या खात्यांत वाढ : बँकांचा खातेदारांशी संपर्क तुटला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th May, 11:46 pm
पीएम जनधन योजनेतील १४ टक्के खात्यांत शून्य ‘धन’

पणजी : पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत राज्यात उघडण्यात आलेल्या एकूण बँक खात्यांपैकी जवळपास १४ टक्के खात्यांमध्ये शून्य रक्कम शिल्लक आहे. या खातेदारांनी कोणतेही आर्थिक व्यवहार केलेले नाहीत. पत्ता बदलणे आणि मोबाईल क्रमांक बंद असणे, यांसारख्या विविध कारणांमुळे बँकांना या खातेदारांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.
राज्यात ३१ मार्च २०२५ अखेरीस जनधन योजनेची एकूण २ लाख १६ हजार ११६ बँक खाती होती. यापैकी २६ हजार ६०१ (१२.३१ टक्के) खात्यांमध्ये शून्य रक्कम होती. ३१ मार्च २०२६ अखेरीस राज्यातील एकूण जनधन खात्यांची संख्या २ लाख ३१ हजार २२९ वर पोहोचली असून, त्यातील ३१ हजार १२६ (१३.४६ टक्के) खात्यांमध्ये एकही रुपया शिल्लक नाही. शून्य शिल्लक असलेली ही खाती प्रामुख्याने स्थलांतरित कामगारांची आहेत. या कामगारांची खाती उघडण्यात आली असली, तरी त्यात कोणतीही आर्थिक देवाणघेवाण झालेली नाही.
ठेवींच्या रकमेत २२ टक्क्यांची वाढ
शून्य शिलकीची खाती वाढली असली, तरी गेल्या वर्षभरात जनधन खात्यांमधील एकूण जमा रकमेत वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२५ अखेरीस या खात्यांमध्ये एकूण १९२.२७ कोटी रुपये जमा होते. ३१ मार्च २०२६ पर्यंत ही रक्कम २३४.७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एका वर्षात या रकमेत २२.१० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तसेच, जनधन खाती आधार कार्डशी संलग्न (सीडिंग) होण्याचे व सत्यापन करण्याचे प्रमाण ८ टक्क्यांनी वाढून ८८.६० टक्क्यांवर पोहोचले आहे. ३१ मार्च २०२६ अखेरीस राज्यातील १ लाख ७७ हजार ४०९ खात्यांचे आधार सीडिंग पूर्ण झाले होते.                        

हेही वाचा