पंजाब, दिल्लीसह देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट

नवी दिल्ली : सीमापार शस्त्रसाठा तस्करी आणि दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शुक्रवारी उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि महाराष्ट्रातील १२ ठिकाणी एकाच वेळी धाडसत्र राबविले. पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी जाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात पाच, महाराष्ट्रात तीन, बिहार, राजस्थानमध्ये प्रत्येकी एक छापे
एनआयएने उत्तर प्रदेशातील पाच, महाराष्ट्रातील तीन तसेच बिहार आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पाकिस्तानस्थित ऑपरेटिव्ह जसवीर चौधरी याच्या स्थानिक सहकाऱ्यांशी संबंधित संशयितांची चौकशी करण्यात येत असून, महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पंजाब, दिल्लीसह देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, जसवीर चौधरी आणि त्याचे भारतीय सहकारी पंजाब, दिल्लीसह देशातील विविध भागांत बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कटात सहभागी होते. या कटासाठी भारत-पाकिस्तान सीमेवरून ड्रोनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळा आणि आयईडी भारतात आणण्यात आल्याचा संशय आहे.
तपास एनआयएकडे
हे प्रकरण सुरुवातीला पंजाब पोलिसांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी नोंदविले होते. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि आंतरराष्ट्रीय दुवे लक्षात घेता २१ मार्च रोजी तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेलला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर या कारवाईची सुरुवात झाली होती.
शस्त्रे, स्फोटके विविध राज्यांमध्ये हल्ले घडवून आणण्यासाठी
अधिकाऱ्यांच्या मते, जप्त करण्यात आलेली शस्त्रे आणि स्फोटके विविध राज्यांमध्ये हल्ले घडवून आणण्यासाठी वापरली जाणार होती. विशेषतः ड्रोनद्वारे शस्त्रांची तस्करी ही सुरक्षा यंत्रणांसमोर नवे आव्हान ठरत असल्याचेही तपास यंत्रणांनी नमूद केले.
एनआयएकडून ‘स्लीपर सेल्स’चा शोध
सध्या एनआयएकडून विविध ठिकाणी सुरू असलेल्या शोधमोहीमेत दहशतवादी जाळ्याचे स्थानिक सहाय्यक, लॉजिस्टिक नेटवर्क आणि संभाव्य ‘स्लीपर सेल्स’ यांचा शोध घेतला जात असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.