कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा

नवे मुख्यमंत्री म्हणून डि. के. शिवकुमार यांच्या नावाची चर्चा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा

बंगळुरू : कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांच्या सचिवांकडे सुपूर्द केला. राज्यपाल थावरचंद गेहलोत  खासगी दौऱ्यावर बाहेर असल्याने त्यांनी लोक भवन येथे जाऊन अधिकृतरीत्या राजीनामा सादर केला. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या दुपारी ३ वाजल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपल्या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत. पुढील मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री डि. के. शिवकुमार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. 

सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीला नवे वळण देत सिद्धरामय्या यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. गुरुवारी सकाळी बंगळुरूतील अधिकृत निवासस्थानी आयोजित न्याहारी बैठकीत त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. या बैठकीला उपस्थित असलेले आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनीही या घडामोडीची पुष्टी केली.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार सिद्धरामय्या यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील विविध योजना, कामगिरी आणि आव्हानांचा उल्लेख करत त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

२९ मे रोजी होणार मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नेत्याची निवड 

दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक शुक्रवारी (२९ मे २०२६) होण्याची शक्यता असून, त्यात पुढील मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नेत्याची निवड किंवा घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. कर्नाटकाच्या राजकारणात या घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा