आखाडा येथील प्रवासी निवारा शेड बनले ‘सरणाच्या लाकडांचे गोदाम’

धोकादायक स्थितीमुळे प्रवाशांची कोंडी : पावसाळ्यात भिजत प्रवासाची भीती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 mins ago
आखाडा येथील प्रवासी निवारा शेड बनले ‘सरणाच्या लाकडांचे गोदाम’

आखाडा येथील मुख्य बसथांब्यावरील प्रवासी निवारा शेड सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून, त्याचा वापर प्रवाशांऐवजी केवळ स्मशानातील सरणांसाठी लागणारी लाकडे ठेवण्यासाठी केला जात आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्याने यंदाच्या पावसाळ्यात शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना उघड्यावर उभे राहूनच बसची वाट पाहावी लागणार असून स्थानिक नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

झुकलेल्या शेडमुळे प्रवाशांची भीती वाढली

आखाडा येथे बसथांब्यावर कित्येक वर्षांपूर्वी पंचायतीतर्फे ही निवारा शेड बांधण्यात आली होती. उन्हाळा आणि पावसाळ्यात प्रवाशांसाठी ही मोठी सोय होती. मात्र, चिखलमय जमिनीवर बांधकाम झाल्याने काही वर्षांतच ही वास्तू नदीच्या बाजूने झुकली आहे. शेडच्या भिंतींना आणि छताला मोठे तडे गेल्याने ती कोसळण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विद्यार्थी आणि प्रवाशांनी या शेडमध्ये थांबणे पूर्णपणे बंद केले आहे.

प्रवाशांच्या जागेत सरणाची लाकडे

धोकादायक बनलेल्या या निवारा शेडमध्ये सध्या अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड साठवून ठेवले जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या बसण्यासाठी असलेली ही जागा आता पूर्णपणे निरुपयोगी बनली असून, बसथांब्यावर प्रवाशांऐवजी सरणाची लाकडे दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

बालरथ आणि ‘माझी बस’ योजनेचा महत्त्वाचा थांबा

पूर्वी या भागात खासगी बसेसची मोठ्या प्रमाणावर सुविधा होती. मात्र कोरोना महामारीनंतर अनेक खासगी बसेस बंद झाल्या. सध्या या मार्गावरून पणजी आणि वास्कोसाठी दोन इलेक्ट्रिक बसेस तसेच ‘माझी बस’ योजनेअंतर्गत एक खाजगी बस धावत आहे. याशिवाय सांतइस्तेव्ह येथील हायस्कूलचे दोन ‘बालरथ’ सकाळी आणि दुपारी विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी याच ठिकाणी येतात. बसच्या वेळेपूर्वीच विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिक येथे येऊन थांबत असतात.

पावसाळ्यात उघड्यावर थांबण्याची वेळ

पावसाळ्यात मुसळधार पाऊस आल्यास आखाडा पुलाजवळ उघड्यावर उभे राहण्याशिवाय प्रवाशांकडे दुसरा पर्याय उरणार नाही. पर्यायी निवारा शेड नसल्याने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना भिजलेल्या अवस्थेतच शाळा, कॉलेज आणि कामावर जावे लागणार आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये चिंता वाढली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार राजेश फळदेसाई यांच्याकडे साकडे

पावसाळा सुरू होण्यापूर्वी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी या गंभीर समस्येकडे वैयक्तिक लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. बसथांब्यावरील उपलब्ध जागेत तातडीने नवीन निवारा शेड उभारून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी आग्रही मागणी समस्त आखाडावासीयांनी केली आहे.

हेही वाचा