म्हणाले-भाजप आमदारांच्या अकाली जाण्याने प्रलंबित राहिलेली कामे मी स्वतः हातावेगळी करत आहे.

पणजी : फोंडा मतदारसंघात सध्या आमदार नसल्यामुळे मतदारसंघातील अनेक नागरिक आणि कार्यकर्ते त्यांच्या विविध कामांसाठी माझ्या कार्यालयात येत आहेत, असा दावा वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी केला. फोंड्यातील जनतेची प्रशासकीय व वैयक्तिक कामे रखडू नयेत म्हणून आपण स्वतः त्यांचे फॉर्म्स पडताळून त्यावर सह्या करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून वाढत्या आग्रहामुळे आपण लवकरच फोंड्यात एक नवीन जनसंपर्क कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणाही ढवळीकर यांनी केली. अधिक मासात या नवीन कार्यालयाचे रीतसर उद्घाटन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या भाजप आमदारांच्या अकाली जाण्याने प्रलंबित राहिलेले दाखले आणि इतर विविध कागदपत्रांवर दररोज सह्या करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. या कामात पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आजी-माजी नगरसेवक घरोघरी जाऊन मदत करत आहेत असेही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
आगामी निवडणुकीत रितेश नाईक यांना उमेदवारी मिळणार का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, उमेदवारीचा निर्णय सर्वस्वी भारतीय जनता पक्ष घेईल. आपण केवळ युती धर्म पाळत असून, आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणे आणि त्यांच्या कामांना प्राधान्य देणे हे आपले कर्तव्य आहे, अशी तटस्थ भूमिका त्यांनी मांडली.