आरजी समितीची आमदार वीरश बोरकर यांच्यासोबत होणार बैठक

पणजी : आरजी समिती सदस्यांचे अंतर्गत वॉट्स ॲप चॅट वायरल झाल्याने पुन्हा खळबळ माजली आहे. आमदार वीरेश बोरकर यांनी आरजीच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे संकेत दिले असतानाच वॉट्स ॲप चॅट वायरल झाल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ही पक्षाची अंतर्गत बाब आहे. चर्चा केल्यानंतर यासंदर्भात स्पष्टीकरण देणार, असे आरजीचे पदाधिकारी अजय खोलकर यांनी सांगितले.
मनोज परब यांनी आरजीचे अध्यक्षपद सोडले तसेच राजकारणही सोडले. त्यानंतर आता आरजीचा नवा अध्यक्ष कोण? अध्यक्षपदाची निवड कधी होणार? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. काहीजण आरजीच्या भविष्याविषयी संशय व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, आरजी बैठकीची तारीख निश्चित करण्यापू्र्वी एक दिवसापूर्वी आपणाला कळवावे, असा इमेल आमदार वीरेश बोरकर यांनी समितीच्या सदस्यांना पाठवला आहे. इमेल आल्याची माहिती पदाधिकारी अजय खोलकर यांनी दिली.
आमदार वीरेश बोरकर यांची बाजू आम्ही ऐकून घेणार. मडगावमध्ये झालेली बैठक तसेच सांत आंद्रे गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेविषयी आमदाराला प्रश्न विचारणार. मनोज परब यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाविषयी सुद्धा चर्चा होणार. आमदार वीरेश बोरकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे. नोटीस जारी करून सुद्धा वीरेश बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. किंवा समितीच्या सदस्यांना भेटण्यासाठी सुद्धा आले नाहीत, असे अजय खोलकर यांनी सांगितले.