शोकाकुल वातावरणात फादर बोलमॅक्स यांना शेवटचा निरोप

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
29 mins ago
शोकाकुल वातावरणात फादर बोलमॅक्स यांना शेवटचा निरोप

पणजी : गोव्यातील पर्यावरण चळवळीत मोठे योगदान दिलेले फादर बोलमॅक्स परेरा यांना आज केपेच्या होली क्रॉस चर्चमध्ये शोकाकुल वातावरणात शेवटचा निरोप देण्यात आला. केपेच्या होली क्रॉस चर्चमध्ये झालेल्या शेवटच्या प्रार्थनेनंतर त्यांचे पार्थ‌िव केपे दफनभूमीत पुरण्यात आले. 

अंत्यसंस्काराच्या वेळी हजारो लोक उपस्थित होते. आमदार निलेश काब्राल, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आमदार वीरेश बोरकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी आमदार जयेश साळगांवकर, कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि इतर मान्यवर आणि पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. 

चिखली, वास्कोच्या सेंट फ्रांसिस झेवियर चर्चमध्ये मुख्य पाद्री असलेले फादर बोलमॅक्स परेरा यांचे  तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आज त्यांच्या पार्थ‌िवावर अंत्यसंस्कार झाले. त्यापूर्वी सकाळी त्यांचे पार्थ‌िव लोकांना शेवटचे दर्शन घेण्यासाठी चिखलीच्या चर्चमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी चर्चमध्ये एक विशेष प्रार्थना झाली. कॉंग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे, आपच्या गोवा प्रभारी आतिशी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

त्यानंतर त्यांचे पार्थ‌िव मूळ गावी केपे येथे नेण्यात आले. वाटेत पारोडा येथील मेरी इमॅक्युलेट चर्च परिसरात लोकांनी अंत‌िम दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे पार्थ‌िव कट्टा, केपे येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यावेळी गावातील लोकांनी शेवटचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. 

ह्रदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी पहाटे निधन झालेल्या फादर बोलमॅक्स यांच्या पार्थ‌िवाची बुधवारी चिकित्सा करण्यात आली होती. शवचिक‌ित्सेच्या अहवालाचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ४ डॉक्टरांचे पथक स्थापन केले होते. हा अहवाल प्रयोगशाळेत पाठवण्यासहीत पोलिसांनाही सादर करण्यात येणार आहे. 


हेही वाचा