आजीसोबत नदीवर गेलेल्या नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू; कुडासे-वानोशी येथील घटना

दोडामार्ग येथील नवीन फ्लॅटच्या उद्घाटनासाठी मुंबईहून आले होते संपूर्ण पाडलोस्कर कुटुंब.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
आजीसोबत नदीवर गेलेल्या नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू; कुडासे-वानोशी येथील घटना

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि चटका लावून जाणारी घटना समोर आली आहे. दोडामार्ग येथे खरेदी केलेल्या नवीन फ्लॅटचे उद्घाटन आणि वास्तू पूजेसाठी मुंबईहून गावी आलेल्या एका कुटुंबातील नातवाचा नदीत बुडून मृत्यू झाला. कुडासे वानोशी येथील तिलारी नदीपात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या वेदांत सचिन सांगेलकर (वय १३, रा. दादर, मुंबई) या बालकाचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. नव्या वास्तूच्या पूजेचे मंगलमय वातावरण असतानाच या अनपेक्षित आघातामुळे संपूर्ण सांगेलकर आणि पाडलोस्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मूळच्या सोनावल येथील असलेल्या कल्पना रवींद्र पाडलोस्कर यांनी दोडामार्ग येथे एक नवीन फ्लॅट खरेदी केला होता. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गृहप्रवेशाच्या पूजेची प्राथमिक तयारी करण्यासाठी त्या मुंबईवरून आपल्या मुलीचा मुलगा ऋत्व दक्षत पाटील (वय ८), व्रीश पाटील आणि भावाचा नातू वेदांत सांगेलकर यांना घेऊन गावी आल्या होत्या. पुढील दोन दिवसांत इतर नातेवाईक मंडळीही गोव्यात आणि गावी दाखल होणार होती. दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सत्रात नातवंडांनी आजीकडे नदीवर आंघोळीला जाण्याचा हट्ट धरला. मुलांच्या हट्टापायी आणि गावी आल्यामुळे आजीलाही नदीवर जाण्याचा मोह आवरला नाही. त्यासाठी त्यांनी कुडासे वानोशी येथील तिलारी नदीचे पात्र निवडले.

सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हे चौघेही नदीकाठावर पोहोचले, जिथे इतरही काही स्थानिक लोक आंघोळ करत होते. सुरुवातीला मोठा भाऊ व्रीश आणि वेदांत पाण्यात उतरले. काही वेळाने व्रीश काठावर उभी असलेली आजी आणि लहान भाऊ ऋत्व यांना घेण्यासाठी पुन्हा काठाकडे आला. याच वेळी वेदांतला नदीच्या प्रवाहातील खोल पाण्यात जाण्याचा मोह झाला. आजी कल्पना यांनी वेदांतला पाण्याचा अंदाज नसल्याने पुढे न जाण्यासाठी मोठ्याने आवाज दिला. मात्र, आजीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत वेदांत पुढे गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो थेट प्रवाहात बुडू लागला.

वेदांत पाण्यात बुडत असल्याचे पाहून आजी आणि इतर मुलांनी आरडाओरडा केला. ते ऐकून तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ नदीपात्रात उड्या घेऊन वेदांतला पाण्याबाहेर काढले. त्याला तातडीने साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी आपल्या पथकासह रुग्णालयात धाव घेतली. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी याच नदीपात्रात आंघोळ करताना मामा-भाचीचा बुडून मृत्यू झाला होता, या दुर्दैवी घटनेने त्या काळ्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत.

हेही वाचा