गुलमर्गमध्ये 'गोंडोला'शेकडो फूट उंचावर हवेतच अडकली

३०० हून अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
just now
गुलमर्गमध्ये 'गोंडोला'शेकडो फूट उंचावर हवेतच अडकली

गुलमर्ग : जम्मू-काश्मीरमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्ग येथील 'गोंडोला' (केबल कार) सेवेत सोमवारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने एकच खळबळ माजली. या बिघाडामुळे केबल कार हवेतच थांबल्याने तब्बल ३०० हून अधिक पर्यटक वेगवेगळ्या केबिनमध्ये ६ तास अडकून पडले होते. मात्र, स्थानिक प्रशासन, लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापन दलाने युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवून सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.

गुलमर्ग गोंडोला सेवेच्या पहिल्या टप्प्यात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. सुरक्षेचा उपाय म्हणून यंत्रणा तात्काळ बंद करण्यात आली, ज्यामुळे अनेक केबिन हवेतच अडकल्या. अचानक केबल कार थांबल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये पाऊस आणि गारपीट होत असल्याने खराब हवामानामुळे सुरुवातीला बचाव कार्यात काही अडचणी आल्या.

घटनेची माहिती मिळताच लष्कर, पोलीस, एनडीआरएफ आणि गोंडोलाच्या त्वरित प्रतिसाद पथकाने  शिड्यांच्या साहाय्याने प्रत्येक केबिनपर्यंत पोहोचून पर्यटकांना सुखरूप खाली उतरवले. या मोहिमेवर स्वतः जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात लक्ष ठेवून होते.

या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या कार्यालयाने सोशल मीडियावर पोस्ट करत नागरिकांना व पर्यटकांना घाबरू नये असे आवाहन केले. "सर्व केबिन सुरक्षित असून तज्ज्ञ पथके बचाव कार्यात गुंतलेली आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे," असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व पर्यटकांची कोणतीही दुखापत न होता सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. सध्या गोंडोला सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली असून, संपूर्ण तांत्रिक दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणी झाल्यानंतरच ती पुन्हा सुरू केली जाईल.


हेही वाचा