महाबळेश्वर रेस्क्यू टीम आणि स्थानिक प्रशासनाकडून दरीत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू.

पोलादपूर: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील अत्यंत धोकादायक अशा आंबेनळी घाटात रविवारी रात्री उशिरा एक भीषण अपघाताची घटना घडली. दापोली येथून पर्यटनाचा आनंद लुटून आपल्या गावी परतणाऱ्या सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांची स्कॉर्पिओ कार अनियंत्रित होऊन थेट ५०० ते १००० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील सर्व आठही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे सर्व मृत तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घाटातील दाभिळ गावच्या हद्दीत घडली. आसगाव येथील आठ युवक स्कॉर्पिओने प्रवास करत होते. आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि अत्यंत धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत गेली. घाटातील हा भाग अतिशय दुर्गम असल्याने आणि रात्रीची वेळ असल्याने प्रशासनाला अपघाताची माहिती मिळण्यास काहीसा उशीर झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस प्रशासनासह महाबळेश्वर रेस्क्यू टीम, प्रतापगड ट्रेकर्स, महाड येथील सिस्केप संस्था, आपदा मित्र आणि स्थानिक मदत दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल आणि कठीण कड्यांची असल्याने बचावकार्यात सुरुवातीला अनेक मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. तरीही शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता दोरांच्या साहाय्याने रात्रभर दरीत उतरून वाहनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक शोधमोहिमेदरम्यान जवानांना ५०० ते ७०० फूट खोल दरीतून दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. सोमवार सकाळपर्यंत मदतकार्य सुरूच होते.

या भीषण अपघातातील मृतांची ओळख पटली असून, महेश अनिल पवार, आदित्य अशोक साळुंखे, रितेश राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, अंश समीर चव्हाण, उत्कर्ष आनंद शिंगटे, अनिल अभिमन्यू शिंगटे आणि नितीन किसन नायकोंडे अशी मृत तरुणांची नावे आहेत. या अपघाताचे वृत्त समजताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधिकारी शंकर काळे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे तसेच साहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन चालू असलेल्या बचावकार्याचा सविस्तर आढावा घेतला. विविध आपत्कालीन विभागांमध्ये योग्य समन्वय साधून ही शोधमोहीम अधिक वेगाने राबवण्याच्या सूचना यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आंबेनळी घाटात यापूर्वीही अनेक भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारे अपघात झाले आहेत. २०१८ मध्ये याच परिसरात दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळल्याने तब्बल ३० जणांचा जागीच मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा पर्यटनासाठी गेलेल्या तरुणांच्या वाहनाला झालेल्या या भीषण अपघातामुळे त्या काळजाला घरे पाडणाऱ्या काळ्याकुट्ट आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. घाटातील तीव्र वळणे आणि चालकांचा सुटणारा ताळमेळ यामुळे हा घाट प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
