२० रुपयांच्या भेळीसोबत मिळाले अनोळखी व्यक्तीचे 'बँक स्टेटमेंट'

सोशल मीडियावर डेटा प्रायव्हसीबाबत तीव्र चिंता

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
6 hours ago
२० रुपयांच्या भेळीसोबत मिळाले अनोळखी व्यक्तीचे 'बँक स्टेटमेंट'

मुंबई : एका रद्दीच्या कागदावर मिळालेल्या भेळीने सध्या सोशल मीडियावर डेटा प्रायव्हसी आणि वैयक्तिक सुरक्षेबाबत एकच खळबळ उडवून दिली आहे. रस्त्यावरील विक्रेत्याकडून घेतलेली 'भेल पुरी' एका ग्राहकाला थेट बँकेच्या खात्याचा तपशील (बँक स्टेटमेंट) असलेल्या कागदावर देण्यात आली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर इंटरनेटवर नागरिकांच्या खाजगी माहितीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सुधांशू अंभोरे नावाच्या एका 'एक्स' (ट्विटर) युझरने या घटनेचा फोटो शेअर करत हा प्रकार उघडकीस आणला. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "मी एका स्ट्रीट व्हेंडरकडून २० रुपयांची भेल खरेदी केली. पण, ती भेल ज्या कागदात गुंडाळली होती, ते 'युनियन बँक ऑफ इंडिया'चे दोन पानांचे बँक स्टेटमेंट होते. त्यावर खातेदाराचे नाव, बँक खाते क्रमांक आणि सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती स्पष्टपणे दिसत होती. आपल्या देशात प्रायव्हसी किती हलक्यात घेतली जाते, याचे हे उत्तम उदाहरण आहे."

"२० रुपयांच्या भेळीसोबत एका नागरिकाचा गोपनीय आर्थिक डेटा रस्त्यावर उघड्यावर आला आहे." ही पोस्ट अवघ्या काही वेळातच तुफान व्हायरल झाली. यावर नेटिझन्सनी अत्यंत तीव्र आणि चिंताजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. संवेदनशील आर्थिक माहिती अशा प्रकारे उघड्यावर आल्यास लोकांची फसवणूक होऊ शकते, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली. गोपनीय कागदपत्रांची विल्हेवाट लावण्यापूर्वी ते  नष्ट का केले जात नाहीत? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, प्रिंटिंग शाई असलेल्या अशा कागदपत्रांमध्ये अन्नपदार्थ देणे आरोग्यासाठी किती घातक आहे, यावरही अनेकांनी तीव्र आक्षेप घेतला. हा प्रकार म्हणजे केवळ नागरी सुजाणतेचा अभाव नसून, डेटा सुरक्षेचे सरळ-सरळ उल्लंघन असल्याचे युझर्सचे म्हणणे आहे. या एका घटनेने देशातील डिजिटल सुरक्षा आणि जबाबदार कागदपत्र विल्हेवाटीच्या पद्धतींवर पुन्हा एकदा नव्याने वाद पेटवला आहे.

हेही वाचा