युद्धविराम कोलमडणार; अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकण्याची भीती; इराणी सैन्य हाय अलर्टवर

अमेरिकेकडून इराणविरोधात नव्या लष्करी कारवाईची तयारी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 hours ago
युद्धविराम कोलमडणार; अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकण्याची भीती; इराणी सैन्य हाय अलर्टवर

वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. (Tensions between the United States and Iran escalated sharply on Saturday)  युद्धविराम कोलमडण्याच्या भीतीमुळे इराणच्या सशस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मध्यपूर्वेत नव्या लष्करी संघर्षाची शक्यता निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  न्यू जर्सीतील नियोजित मुक्काम अचानक रद्द करून वॉशिंग्टनला परतल्याची माहिती आहे.  तसेच अमेरिकेतील अनेक वरिष्ठ गुप्तचर आणि संरक्षण अधिकाऱ्यांनीही आपले सुट्टीचे कार्यक्रम रद्द करून राजधानीत तातडीची बैठक घेतल्याचे समोर आले आहे. व्हाइट हाऊसकडून इराणविरोधात नव्या लष्करी कारवाईच्या तयारीचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे.

मध्यपूर्वेत मोठ्या लष्करी हालचाली

दरम्यान, इराणने संभाव्य युद्धपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पश्चिमेकडील हवाई क्षेत्राचा काही भाग सोमवार सकाळपर्यंत बंद केला आहे. यामुळे मध्यपूर्वेत मोठ्या लष्करी हालचाली सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“तिसरी संघर्ष योजना” 

इराणशी संबंधित माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि इराणी सैन्याने “युद्ध पुन्हा सुरू होण्याच्या” शक्यतेमुळे विशेष रणनीती तयार केली आहे. अमेरिकेच्या हितसंबंधांवर आणि त्यांच्या सहयोगी देशांच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करणारी “तिसरी संघर्ष योजना” तयार करण्यात आल्याची माहिती आहे. 

राजनैतिक चर्चा सुरू 

तथापि, युद्धजन्य वातावरण असतानाही पडद्यामागे राजनैतिक चर्चाही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. चर्चेत काही प्रमाणात प्रगती झाल्याचा दावा इराणी सूत्रांनी केला असला तरी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अद्याप मतभेद कायम आहेत. “सध्या युद्ध थांबवणे हेच मुख्य उद्दिष्ट असून; त्यानंतरच इतर विषयांवर चर्चा होईल,” असे एका सूत्राने सांगितले.

अमेरिका-इराण तणावामुळे जागतिक राजकारण आणि तेलबाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



हेही वाचा