धमकीचे चॅट्स स्क्रीनशॉटसह एक्सवर शेअर करत दीपके यांनी उडवून दिली मोठी खळबळ.

वॉशिंग्टन :आठवड्याभरातच सोशल मिडियावर तूफान प्रसिद्ध झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीपके यांनी त्यांच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर या धमकी संदर्भातील चॅटिंगचे स्क्रीनशॉट आणि धमकी आलेल्या फोन क्रमांकासह माहिती पोस्ट केल्याने इंटरनेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
अज्ञात क्रमांकावरून आलेल्या या संदेशात त्यांना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट तातडीने बंद करण्याचे बजावण्यात आले आहे. असे केल्यास त्यांना पैसे मिळतील, अन्यथा थेट अमेरिकेत येऊन मारून टाकले जाईल, असा गंभीर इशारा या धमकीत देण्यात आला आहे. या घटनेमुळे डिजिटल माध्यमांवरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय उपरोधातून निर्माण होणारे वैयक्तिक सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अभिजित दीपके यांनी नुकतेच तिथे पब्लिक रिलेशन्सचे (PR) उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला असून, ते पुढील महिन्यात भारतात परतण्याची योजना आखत आहेत. मात्र, मायदेशी परतण्यापूर्वीच त्यांना केवळ जीवे मारण्याची धमकीच आलेली नाही, तर भारतात पाऊल ठेवताच आपल्याला अटक केली जाईल, अशी तीव्र भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

एका प्रसिद्ध माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत दीपके यांनी म्हटले आहे की, सध्या देशातील राजकीय परिस्थिती आणि विरोधी विचारवंतांवर ज्या पद्धतीने कारवाई केली जात आहे, ते पाहता त्यांना दिल्ली विमानतळावर उतरताच दिल्ली पोलीस ताब्यात घेतील आणि थेट तिहार तुरुंगात नेतील अशी दाट शक्यता वाटते. यामुळे त्यांच्या भारत दौऱ्याविषयी आणि सुरक्षिततेविषयी त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी अतिशय तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या या डिजिटल चळवळीशी जोडलेले हजारो तरुण दीपके यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. अनेक युजर्सनी त्यांच्या पोस्टवर कमेंट्स करत तू घाबरू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत, असा विश्वास दिला आहे, तर काहींनी मजेशीर आणि उपरोधिक भाषेत आम्ही सर्व झुरळ तुझ्या सोबत आहोत असे म्हणत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. काही नेटकऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तातडीने सुरक्षा पुरवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. एका बाजूला हा एखाद्या अंतर्गत राजकीय वैमनस्याचा किंवा वाढत्या प्रभावाचा परिणाम असू शकतो, तर दुसऱ्या बाजूला हा डिजिटल पातळीवर कोणाचा खोडसाळपणा असू शकतो, असाही संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून, यामुळे डिजिटल विश्वातील सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.