घटना सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला आली जाग.

मुंबई : महाराष्ट्रातील परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात सध्या डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे शेतकरी आणि वाहनधारकांचे अतोनात हाल होत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये इंधन टंचाईची अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या गंभीर परिस्थितीमध्ये परभणी जिल्ह्यातील काही पेट्रोलपंप चालकांनी शेतकऱ्यांना डिझेल देण्यासाठी चक्क 'सातबारा उतारा' दाखवण्याची अजब अट घातल्याचे समोर आले आहे. या अजब मागणीमुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ऐन शेतीच्या कामाच्या हंगामात इंधनासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे.

परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून डिझेलचा मोठा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर “नो स्टॉक” चे फलक झळकताना दिसत आहेत, तर ज्या मोजक्या पंपांवर डिझेल उपलब्ध आहे, तिथे वाहनांची प्रचंड गर्दी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकरी पहाटेपासूनच हातात कॅन घेऊन किंवा ट्रॅक्टरसह रांगेत उभे राहत आहेत. अशातच पंप चालकांनी “सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या” अशी सक्ती केल्याने या समस्येने अधिकच गंभीर रूप धारण केले आहे. हीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरातही पाहायला मिळत असून, तिथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांसोबतच शेतीकामासाठी लागणारे ट्रॅक्टर इंधनासाठी तासनतास ताटकळत उभे आहेत.
दुसरीकडे, वाशिम जिल्ह्यातही डिझेलच्या तुटवड्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अकोला नाका परिसरातील एका पेट्रोल पंपावर मध्यरात्री डिझेलचा टँकर दाखल होताच नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे प्रत्यक्ष वितरण प्रक्रियेला विलंब झाल्याने नागरिकांना पहाटेपर्यंत पंपावरच मुक्काम करावा लागला. या इंधन संकटामुळे ग्रामीण भागातील शेतीची कामे पूर्णपणे प्रभावित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची प्रसारमाध्यमांनी गंभीर दखल घेतल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परभणीमधील पेट्रोलपंप चालकांकडून सातबारा मागितला जाणे हे अत्यंत चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी तातडीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यात डिझेल आणि पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे. तसेच, जो कोणताही पेट्रोलपंप चालक अशा प्रकारच्या अवाजवी अटी घालून ग्राहकांची अडवणूक करेल, त्याच्यावर प्रशासनातर्फे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी या वेळी दिला.
