आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक; भारतीय विमानतळांवर हाय-अलर्ट!

आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे कडक स्क्रिनिंग सुरू

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
5 hours ago
आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक; भारतीय विमानतळांवर हाय-अलर्ट!

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने देशोदेशींच्या विमानतळांवर तात्काळ प्रभावाने 'हाय-अलर्ट' जारी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी केल्यानंतर भारताने हे खबरदारीचे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर  सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करत स्क्रीनिंग अधिक कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

India issues Ebola health advisory for incoming international passengers

नवीन नियमांनुसार, अतिजोखमीच्या देशांमधून येणाऱ्या किंवा तिथून प्रवास करून भारतात पोहोचणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशन क्लिअरन्सपूर्वी विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांकडे आपली आरोग्य माहिती देणे बंधनकारक राहील. प्रवाशांना भारतात आल्यावर २१ दिवसांच्या आत ताप, उलट्या, अशक्तपणा, डोकेदुखी किंवा शरीरातून अचानक रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे दिसल्यास त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला कळवणे गरजेचे आहे. विमान कंपन्यांना विमानात प्रवासादरम्यानच उद्घोषणा  करण्याचे आणि प्रवाशांकडून 'स्वयं-घोषणापत्र' भरून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातील पूर्वतयारीचा आढावा घेतला. भारतात अद्याप एकही इबोलाचा रुग्ण आढळलेला नसला, तरी 'जागतिक आरोग्य संघटने'ने या आजाराला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHEIC) घोषित केल्यामुळे भारत सरकारने ही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. विमानतळांवर प्रवाशांसाठी आयसोलेशन वॉर्ड (विलगीकरण कक्ष) आणि सुसज्ज रुग्णवाहिका २४ तास तैनात ठेवण्याच्या सूचना विमानतळ चालकांना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कंपन्यांना त्यांच्या आफ्रिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा इतिहास आणि बोर्डिंग पास  २१ दिवसांपर्यंत जतन करून ठेवण्यास सांगितले आहे. प्रवासाची किंवा आजाराची माहिती लपवणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना इबोला संदर्भातील 'स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर' पाठवण्यात आली असून, संशयित रुग्णांचे व्यवस्थापन, प्रयोगशाळा तपासणी आणि विलगीकरण याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी झिका आणि निपाह व्हायरसच्या वेळी वापरण्यात आलेल्या प्रोटोकॉलनुसारच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.


हेही वाचा