२२ हजार रिक्त पदांवरून मुख्यमंत्री- राणे यांच्यात शाब्दिक टोलेबाजी

पणजी : गोव्यातील सरकारी खात्यांमध्ये सुमारे २२ हजार पदे रिक्त असल्याचा दावा करत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकासह मिश्कील टिप्पणी केली. “मुख्यमंत्री जादूगार आहेत. निवडणुकीपूर्वी ते नोकऱ्या देतील, असा मला विश्वास आहे,” असे वक्तव्य राणे यांनी केले. तसेच, गोव्यात पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राणे यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, सरकारी खात्यांमध्ये रिक्त पदे असली तरी नोकरभरती प्रक्रिया कर्मचारी निवड आयोगामार्फतच पार पडणार आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक टोलेबाजी रंगली
दोन्ही नेत्यांमध्ये नोकऱ्यांवरून आज शाब्दिक टोलेबाजी रंगली. मुख्यमंत्र्यांनी सरकारी खात्यांमध्ये २२ हजार पदे रिक्त असली, तरी भरती प्रक्रिया नियमानुसार कर्मचारी निवड आयोगाद्वारेच होईल असे म्हणत विश्वजीत राणे यांनी त्यांच्या खात्यातील रिक्त पदांची माहिती आयोगाकडे पाठवावी नंतर किती नोकऱ्या आहेत ते बघू असे नमूद केले.
सरकारी खात्यांमध्ये नक्कीच हजारो नोकऱ्या आहेत. मात्र सर्व नोकर भरती आयोगामार्फतच होईल. काही नोकऱ्या मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत भरल्या जातात असेही त्यांनी सांगितले.
राणे यांनी सत्तरीसह गोव्यातील सर्व मतदारसंघ नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत त्यामुळे पुढील काही महिन्यांत निवडणुकीपूर्वी नोकर भरती करावी असे म्हटले होते.
सरकारी नोकऱ्यांच्या भरतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विषयाला राजकीय रंग चढण्याची चिन्हे दिसत आहेत.