आरोग्यमंत्री राणेंच्या विधानावरून काँग्रेसची भाजपवर जोरदार टीका

पणजी : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जादूगार असे संबोधत, गोव्यात २२ हजार सरकारी नोकऱ्या रिक्त असल्याचे आणि त्या निवडणुकीपूर्वी भरल्या जातील असे विधान केले होते. या विधानाचा समाचार घेत काँग्रेसने भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसचे पदाधिकारी अमरनाथ पणजीकर म्हणाले की, हे विधान म्हणजेच भाजप सरकारचे अपयश, हतबलता आणि प्रशासकीय दिवाळखोरी उघड करणारे आहे. जेव्हा सरकारकडे दाखवण्यासाठी स्वतःची कामगिरी नसते, बेरोजगार युवकांच्या प्रश्नांना उत्तरे नसतात आणि जनतेसमोर मांडण्यासाठी कोणताही ठोस प्रगतीचा अहवाल नसतो, तेव्हा ते जादू, भ्रम विकू लागतात, असा टोला त्यांनी लगावला.
गोव्यातील हजारो सुशिक्षित तरुण सध्या बेरोजगारी, कंत्राटी पद्धतीवरील नोकऱ्या, स्थलांतर आणि नैराश्याचा सामना करत असताना, दुसरीकडे काही मोजक्याच लोकांना राजकीय आश्रय आणि लाभ मिळत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
पणजीकर पुढे म्हणाले की, गोव्याच्या जनतेने सरकार हे सक्षम प्रशासन चालवण्यासाठी निवडले आहे, जादूचे प्रयोग पाहण्यासाठी नाही.