सरकारी खात्यांमध्ये २२ हजार नोकऱ्या; मुख्यमंत्री जादूगार : मंत्री विश्वजीत राणे

म्हणाले; गोव्यात पुन्हा येईल भाजपचेच सरकार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
32 mins ago
सरकारी खात्यांमध्ये २२ हजार नोकऱ्या;  मुख्यमंत्री जादूगार : मंत्री विश्वजीत राणे

पणजी : गोव्यात सरकारी नोकऱ्यांबाबत विशेष क्रेझ आहे. सर्व मतदारसंघातील युवकांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे. सध्या विविध सरकारी खात्यांमध्ये २२ हजार रिक्त पदे आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे जादूगार असून; ते विधानसभा निवडणुकीपूर्वी या जागा भरतील अशी खात्री आहे. असे काम केवळ भाजप पक्षचा करू शकतो. असे  प्रतिपादन आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी केले. शुक्रवारी पणजी येथे झालेल्या नर्सिंग परिषदेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.



राणे म्हणाले की, आम्ही एक संघ म्हणून काम करत आहोत. केवळ एका मतदारसंघासाठी नव्हे तर पूर्ण राज्यासाठी कामे करत आहोत. युवकांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे. त्यांच्या अपेक्षा आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. मुख्यमंत्र्यांना देखील राज्यातील युवकांची काळजी आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी रिक्त २२ हजार पदे भरली जातील असा विश्वास आम्हाला आहे. असे झाले तर युवकांचे समाधान होईल. 

आम्ही केलेल्या विकास कामांमुळे पुढील सरकार देखील भाजपचे असणार अशी खात्री आहे. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात राणे यांनी सांगितले की, मागील काही वर्षात राज्यातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. सरकारी इस्पितळात आधुनिक उपकरणे, प्रशिक्षित नर्स, डॉक्टर उपलब्ध आहेत. रुग्णांच्या सरकारी नर्स कडून खूप अपेक्षा असतात. मात्र नर्स किती काम करते हे त्यांना माहिती नसते. असे असले तरी नर्सनी प्रेमळपणे काम करणे आवश्यक आहे. राज्यात लवकरच नर्शरी कर्करोग रुग्णालय सुरू होणार आहे. येथे ५०० ते ६०० नर्ससाठी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

माझ्या खिशातून देतो पगार 

राणे यांनी सांगितले की, सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पेडियाट्रिक विभाग तसेच आयव्हीएफ केंद्रातील काही कर्मचाऱ्यांचा पगार मी माझ्या खिशातून देत आहे. अशा कर्मचाऱ्यांना सीएसआर निधीतून पगार देणे ही शक्य आहे. या कर्मचाऱ्यांना कंत्राटी करण्याबाबत मी सरकारकडे फाईल पाठवली आहे. याबाबत देखील मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे.

हेही वाचा