पणजी स्मार्ट सिटीतील रस्ते खड्डेमय

हॉटमिक्स केलेले रस्ते जागोजागी खचले : महापौरांकडून हात वर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
1 hours ago
पणजी स्मार्ट सिटीतील रस्ते खड्डेमय

 सांतीनेज परिसरातील सरोवर रेस्टॉरंटलगत खचलेला रस्ता. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या पणजीतील रस्त्यांची अवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वर्षभरापूर्वी हॉटमिक्स करण्यात आलेले अनेक रस्ते आता जागोजागी खचू लागले असून मोठमोठे खड्डे पडत आहेत. विशेषतः सांतीनेज परिसरातील सरोवर रेस्टॉरंटलगतचा रस्ता अचानक खचल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
सकाळच्या सुमारास सांतीनेज येथील रस्त्याचा काही भाग खचून सुमारे दोन फुट खोल खड्डा तयार झाला. रस्त्याखालील माती मऊ झाल्याने खड्ड्याचा परिसर आणखी खचत गेला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पणजी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बॅरिकेडिंग केले आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले.
घटनास्थळी उपस्थित असलेले पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी २०१८-१९ पूर्वी टाकण्यात आलेली जुनी केबल लाईन असल्यामुळे रस्ता खचला असावा. रस्त्याखालील भाग पूर्णपणे उकरून त्यात सिमेंट व खडी टाकून तो भाग भरला जाईल. त्यानंतर रस्त्यावर डांबरीकरण करून तो समतोल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मोन्सेरात म्हणाले, रस्ता भरल्यानंतर काही काळ परिस्थितीचे निरीक्षण केले जाईल. पुन्हा खचण्याची शक्यता नसल्याची खात्री झाल्यानंतरच अंतिम डांबरीकरण केले जाईल.
शहरातील अन्य भागांतही धोक्याची चिन्हे
सांतीनेजपुरतेच हे मर्यादित नसून पणजीतील आणखी दोन-तीन ठिकाणी रस्ते खचण्यास सुरुवात झाल्याचे महापौरांनी मान्य केले. संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्यांची ही अवस्था झाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्मार्ट सिटीचा संबंध नाही : महापौर
महापौरांनी स्पष्ट केले की, हा प्रश्न सिव्हरेज लाईनचा नसून जुन्या बीएसएनएल अथवा इतर कंपन्यांच्या केबल लाईनशी संबंधित आहे. पूर्वी टाकण्यात आलेल्या केबल्स रस्त्याखाली खोलवर राहिल्याने त्याच्या बाजूचा भाग कमकुवत झाला आणि त्यामुळे रस्ता खचू लागला. त्यांनी पुढे सांगितले की, संबंधित रस्ता अद्याप ‘डिफेक्ट लायबिलिटी पिरियड’मध्ये असल्याने कंत्राटदाराकडूनच दुरुस्ती करून घेतली जाणार आहे. हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत झालेले नसून जुने काम आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा याच्याशी थेट संबंध नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.            

हेही वाचा