चौघांविरोधात गुन्हा दाखल : पणजी पोलिसांकडून शोध सुरू

पणजी : सांताक्रूझ येथील जयवेल शेट्टी (२५) या युवकावर पूर्ववैमनस्यातून बिअर बाॅटल आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पणजी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी जयवेल शेट्टी (२५) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार गुरुवार २१ रोजी सकाळी ८ वाजता करंझाळे येथील एका विद्यालयाजवळ उभा होता. त्यावेळी पूर्ववैमनस्यातून चार जणांनी चाकू व बिअरच्या बाटलीने त्याच्या डोक्यावर हल्ला केला. तसेच तक्रारदाराला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि गंभीर परिणामांची धमकी दिली. त्यावेळी रक्तस्राव झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. तिथे उपचार केल्यानंतर त्याला घरी पाठविण्यात आले.
या प्रकरणी पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पेडणेकर यांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, चारही संशयित फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करून त्यांच्या मागावर पाठविण्यात आले आहे.