छत्तीसगड पोलिसांकडून कांदोळी येथे ६ जणांना अटक

पणजी : छत्तीसगडच्या रायगढ पोलिसांनी ‘ऑपरेशन अंकुश’ अंतर्गत गोव्यात कांदोळीत छापा टाकून हवाला व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सट्टा नेटवर्कशी संबंधित असलेल्या मोठ्या ऑनलाईन आयपीएल बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला. हे रॅकेट एका विशिष्ट अॅप्लिकेशनचा (अॅप) वापर करत होते. सदर अॅप सार्वजनिक टेलिव्हिजन प्रसारणाच्या सुमारे सात सेकंद आधीच लाईव्ह क्रिकेट सामन्याची माहिती देत होते. या कारवाईत सहा संशयितांना अटक करण्यात आली.
रायगढ पोलिसांच्या कोतवाली पोलीस स्थानकाच्या हद्दीत ऑनलाईन क्रिकेट बेटिंग व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार, कोतवाली पोलिसांनी संबंधित आयपीएल बेटिंग रॅकेटवर छापा टाकून दोघा संशयितांना अटक केली. यात करण चौधरी उर्फ अग्रवाल आणि पुष्कर अग्रवाल याच्यावर कारवाई केली. याच दरम्यान घारघोडा पोलिसांनी छापा टाकून चार जणांना अटक केली. यात सुमारे १ कोटी २ लाख रुपये रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास रायगढ पोलिसांच्या सायबर विभागाने हाती घेतला. त्यानंतर विभागाने वरील प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची चौकशी केली. दरम्यान, रायगढ पोलिसांनी इतर बेटिंग प्रकरणात हवा असलेला अमित मित्तल कांदोळी येथील एका बंगल्यातून आयपीएल बेटिंग चालवत असल्याचे समोर आले. त्यानुसार, रायगढ पोलीस शुक्रवार, १५ रोजी कांदोळी येथे छापा टाकला. त्यात अमित मित्तल, मोहित सोमानी, प्रकाश वाधवानी, आकाश मोटवानी, राहुल खांडेलवाल उर्फ बाबू आणि सुलभ खंडेलवाल उर्फ छोटा बाबू या सहा जणांना अटक करून रायगढला घेऊन गेले. त्यांच्याकडून १० मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले.
वरील रॅकेट प्रगती टिव्ही अॅप आणि स्टार लाइव या विशिष्ट अॅप्लिकेशनचा वापर करत होते. हे अॅप सार्वजनिक टेलिव्हिजन प्रसारणाच्या सुमारे सात सेकंद आधीच लाईव्ह क्रिकेट सामन्याची माहिती देत होते. या माहितीचा फायदा घेऊन आरोपी आयपीएल सामन्यांदरम्यान बेटिंग दरांमध्ये फेरफार करत होते आणि सट्ट्यात आघाडी मिळवत होते. तसेच रॅकेट दुबईतील ऑपरेटर्सकडून आॅल पैनल एक्सचेंज, ताज ७७७, डायमंड एक्सचेंज अशा बेटिंग आयडी मिळवत होते. त्यानंतर ते आयडी अनेक शहरांतील स्थानिक एजंट्स आणि खेळाडूंना वितरित केले जात होते. यामध्ये मोठे हँडलर लहान ऑपरेटर्स आणि एजंट्सना आयडी पुरवत होते व व्यवहार आणि सट्टा क्रियांवर कमिशन घेत होते.
रॅकेट ‘मन्नू नथानी’ नावाच्या व्यक्तीशी संबंधित
रॅकेट ‘मन्नू नथानी’ नावाच्या व्यक्तीशी संबंधित असलेल्या मोठ्या सट्टा रॅकेटचा भाग असल्याचे समोर आले आहे. तसेच हवाला व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय बेटिंगशी निगडित रॅकेट असून पुढील काही दिवसांत आणखीन संशयितांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.