गांजाचे वजन व्यावसायिक प्रमाणात, एक संशयित फरार असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

पणजी : मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे जप्त केलेल्या हायड्रोपोनिक गांजाचे वजन व्यावसायिक प्रमाणात आहे. तसेच या प्रकरणातील एक संशयित फरार अाहे, असे निरीक्षण नोंदवून विदेशातून आणलेल्या ८.३४ कोटी ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक केलेल्या संशयित सीमा कटयाल (३७, हरयाणा), अमीर सय्यदहुला खान (३१, मुंबई) आणि अंसारी मोहम्मद साजिद (३४, मुंबई) या संशयिताचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याबाबतचा आदेश सत्र न्या. विजया आंब्रे यांनी दिला.
गोवा विभागाच्या कस्टम अधिकाऱ्याला २५ मार्च २०२६ रोजी मस्कतहून आलेल्या विमानातून ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, अधिकाऱ्यांनी प्रवासी तसेच त्यांच्या साहित्याची तपासणी केली. यावेळी तीन प्रवाशांवर संशय आला. थायलंडहून मस्कतमार्गे गोव्यात आलेल्या पुणे येथील तन्मय जाधव आणि माधुरी नायडू या दोघांची चौकशी केली. अबूधाबीहून आलेल्या सीमा कटयाल (३७, हरयाणा) तसेच दाबोळी विमानतळावरून मुंबईहून आलेल्या आणि मोपा विमानतळाच्या बाहेर उभे असलेले अमीर सय्यदहुला खान (३१, मुंबई) आणि अंसारी मोहम्मद साजिद (३४, मुंबई) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या साहित्याची झडती घेतली असता, ८ कोटी ३४ लाख १२ हजार रुपयांचा २३.८३२ किलो हायड्रोफॉनिक विड हा गांजा सापडला. हा गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर वरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केली असता, न्यायालयाने संशयितांना न्यायालयीन कोठडी ठोठावली.
दरम्यान, संशयित सीमा कटयाल, अमीर सय्यदहुला खान आणि अंसारी मोहम्मद साजिद या तिघांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, कस्टमतर्फे अधीक्षक अनुप पी. एस यांनी बाजू मांडली. त्यात वरील तिघांचा सहभाग असून या संदर्भात त्यांनी न्यायालयात पुरावे सादर केले. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून तिघा संशयितांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
तन्मय जाधवचा फेटाळला होता जामीन
संशयित तन्मय जाधव याने वैद्यकीय कारण समोर करून मेरशी येथील सत्र न्यायालयात जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. हा जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. यानंतर सीमा कटयाल, अमीर सय्यदहुला खान आणि अंसारी मोहम्मद साजिद या तिघांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.