
पणजी : पर्वरी येथे जुन्या मांडवी पुलावर शुक्रवार, ८ रोजी इनोवा आणि दुचाकीमध्ये अपघात झाला होता. यात दुचाकी चालक सागर पालयेकर (३५, पर्वरी) जखमी झाला होता. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (जीएमसी) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी कार चालक नीलेश विखार (पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली.
पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोवा कार चालक नीलेश विखार (पुणे) शुक्रवार ८ रोजी दुपारी १.२० वाजता पणजीहून पर्वरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी जुन्या मांडवी पुलावर इनोवा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालक सागर पालयेकर रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच तिथे उपस्थित असलेल्यांनी त्याला तातडीने १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीपाद तेली यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. याप्रकरणी पर्वरीचे उपनिरीक्षक आकाश चोडणकर यांनी इनोवा चालक नीलेश विखार (पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली.