१५० डबे घेतले ताब्यात : पोलीस, डीएसपीसीए, एफडीए यांची कारवाई

मडगाव : येथील खारेबांध भागात बजरंग दल, डीएसपीसीए, एफडीए आणि मडगाव पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत सुमारे १५० डबे प्राण्याच्या चरबीपासून बनवलेले डालडाचे डबे जप्त केले. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने खारेबांध येथील एका संशयास्पद ठिकाणावर छापा टाकला. या कारवाईत बजरंग दलाचे विराज देसाई, भगवान रेडकर यांच्यासह दक्षिण गोवा प्राणी क्रूरता प्रतिबंधक समितीचे राज प्रतीक, मडगाव पोलीस व अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. चरबीपासून बनवलेल्या डालड्याचे डबे परराज्यात घेऊन जाण्यासाठी गाडीत भरलेले असतानाच हा छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात साठा सापडला. तपासणी केली असता, १५० डब्यांत प्राण्यांच्या चरबीपासून बनविलेले डालडा असल्याचे उघड झाले.
बजरंग दलाकडून या प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मडगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मडगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, हा साठा नेमका कोणाचा आहे आणि तो कुठून आला, याचा शोध घेतला जात आहे. बजरंग दलाने या बेकायदेशीर व्यापारावर तीव्र आक्षेप घेत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संशयित मोहम्मद शब्बीर बेल्लारी (४०, मूळ रा. हुबळी, कर्नाटक) हा बोलेरो पिक-अपमधून कोणताही वैध परवाना नसताना प्राण्यांच्या चरबीचा साठा वाहून नेत होता. संशयिताकडून एकूण १५२ कंटेनर चरबी जप्त करण्यात आली आहे. हा साठा प्राण्यांची बेकायदेशीर हत्या करून मिळवण्यात आला असून, त्याचा वापर भेसळीसाठी आणि घातक अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास उपनिरीक्षक शुभम गावकर करत आहेत.
दोषींवर कारवाईची बजरंग दलाची मागणी
बजरंग दलाच्या दाव्यानुसार, गाईच्या कत्तली करून त्यांच्या चरबीपासन हे तुपसमान डालडा बनविण्यात येते व परराज्यात पाठविण्यात येते. ज्या डब्यांमधून या मालाची वाहतूक होत आहे त्या कंपनीची चौकशी व्हावी व या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी बजरंग दलाच्या विराज देसाई यांनी केली.