बिट्स पिलानीतील आत्महत्यांच्या सत्रामुळे प्रशासन पुन्हा सतर्क

पणजी : सांकवाळ येथील बिट्स पिलानीच्या कॅम्पसमध्ये अर्जुन साबू (२६) या विद्यार्थ्याने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दीड वर्षांत कॅम्पसमधील ही सातवी आत्महत्या असल्याने विद्यार्थी, पालक आणि प्रशासनामध्ये गंभीर चिंता व्यक्त होत आहे. या सलग घटनांमुळे संस्थेच्या व्यवस्थेवर आणि विद्यार्थ्यांवरील तणावाच्या वाढत्या दबावावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वी घडलेल्या सहा आत्महत्यांच्या घटनांनंतर बिट्स पिलानी व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि प्रशासन सतर्क झाले होते. राज्य सरकारनेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संस्थेला काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव वाढू नये, त्यांना नैराश्य किंवा एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत होत्या. समुपदेशन सत्रे, शिक्षकांकडून नियमित संवाद, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक अडचणींकडे लक्ष देणे, तसेच परीक्षा काळात विशेष देखरेख ठेवणे अशा अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते.
सध्या कॅम्पसमध्ये परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शिक्षक रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांशी संपर्कात राहत होते. काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये संवाद वाढवण्यासाठी विशेष उपक्रमही सुरू केले होते. तरीदेखील अर्जुन साबू या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अर्जुन हा कॅम्पसबाहेर राहत असल्याची माहिती समोर आली असून प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
गेल्या दीड वर्षांतील घटनांकडे पाहिले असता परिस्थितीची भीषणता अधिक स्पष्ट होते. ११ डिसेंबर २०२४ रोजी गाझियाबाद येथील २० वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर ५ मार्च २०२५ रोजी गोव्यातील अथर्व देसाई या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. १ मे २०२५ रोजी लखनऊ येथील कृष्णा कासेरा याने आत्महत्या केली. १६ ऑगस्ट २०२५ रोजी कुशाग्र जैन या विद्यार्थ्याचा गूढ मृत्यू झाला होता. ४ सप्टेंबर २०२५ रोजी कर्नाटकातील १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यानंतर २ फेब्रुवारी २०२६ रोजी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतील तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी वैष्णवी जितेश हिने आत्महत्या केली होती. आता अर्जुन साबूच्या मृत्यूने या घटनांची मालिका आणखी गंभीर बनली आहे.
या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्च शिक्षणासाठी देशभरातून गोव्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थैर्य यालाही तितकेच महत्त्व देण्याची गरज अधोरेखित होत आहे. तज्ज्ञांच्या मते, स्पर्धा, अभ्यासाचा ताण, करिअरची चिंता, घरापासून दूर राहण्यामुळे निर्माण होणारा एकटेपणा आणि मानसिक आरोग्याबाबत अजूनही असलेली संकोचाची भावना यामुळे अनेक विद्यार्थी नैराश्याकडे ढकलले जातात.
दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले जाईल, असे सांगितले आहे. प्रशासन, पोलीस आणि संस्थेचे व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधून विद्यार्थ्यांसाठी अधिक प्रभावी मानसिक आरोग्य सहाय्य प्रणाली उभारण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सलग घडणाऱ्या या आत्महत्यांची मालिका थांबवण्यासाठी नेमके कोणते ठोस उपाय आवश्यक आहेत, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.