एकूण ९३ पुरुष, २ महिला कैदी : दोघे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, ११ पदवीधर

पणजी : राज्यातील कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगात खून, बलात्कार, अपहरण, प्राणघातक हल्ला, अमली पदार्थ तस्करी मारहाण व इतर गुन्हेगारी कृत्यामुळे ९५ कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यातील ७०.५३ टक्के म्हणजे ६७ कैदी शिक्षित असल्याचा अहवाल राष्ट्रीय गुन्हा नोंदणी विभागाने (एनसीआरबी) जारी केला आहे. कैद्यांची ही आकडेवारी ३१ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंतची आहे.
राज्यात भारतीय दंड संहितेच्या खून, बलात्कार, प्राणघातक हल्ला, फसवणूक तसेच अमली पदार्थ तस्करी, सायबर व आर्थिक गुन्हे, मोटार अपघात व इतर गुन्ह्यांत समावेश असल्यामुळे ९५ जणांना राज्यातील विविध न्यायालयाने शिक्षा ठोठावली. त्यात ९३ पुरुष तर २ महिलांचा समावेश होता. ८७ देशी तर ८ विदेशी नागरिकांचा यात समावेश आहे. यातील शिक्षा भोगणाऱ्या ९५ कैद्यांपैकी २९.४७ टक्के म्हणजे २८ कैदी अशिक्षित होते. तर, ७०.५३ टक्के म्हणजे ६७ शिक्षित कैदी शिक्षा भोगत असल्याचा अहवाल एनसीआरबीने जारी केला आहे. शिक्षित कैद्यांपैकी २ पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, दोन कैद्यांनी अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतले होते.
याशिवाय ११ जणांनी पदवी प्राप्त केल्या, तर ३३ कैद्यांनी ११ ते चौदावीपर्यंत शिक्षण घेतले. तर, १९ जणांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालातून समोर आली आहे.
कोलवाळ तुरुंगात ५८ गोमंतकीय कैदी
एनसीआरबीच्या अहवालानुसार, सर्वाधिक ५९ कैदी ३० ते ५० वयोगटातील आहेत. त्यानंतर १८ ते ३० वर्षांखालील १९ कैदी, ५० वर्षांहून जास्त वयोगटातील १७ कैद्यांचा समावेश होता. याशिवाय ९५ कैद्यांपैकी ५८ गोमंतकीय, २९ परप्रांतीय तर ८ विदेशी नागरिक कोलवाळ तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.