संशयिताचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न दिसून आल्याने खूनप्रकरणी जामीन फेटाळला

जमीदार रेहमान खून प्रकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15 hours ago
संशयिताचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न दिसून आल्याने खूनप्रकरणी जामीन फेटाळला

पणजी : संशयिताने प्रथम जमीदार रेहमान बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रेहमानचा मृतदेह सापडल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंदवण्यासाठीही त्यानेच तक्रार दाखल केली. तपास भरकटवण्याचा हा प्रयत्न असल्याचे निरीक्षण नोंदवत मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने रेहमान खून प्रकरणातील संशयित चांदमिया जब्बर याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याबाबतचा आदेश न्या. बॉस्को रॉबर्ट्स यांनी दिला.

डिचोली पोलिसांनी २०२० रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, प्रथम संशयित चांदमिया जब्बर हा मोहित इस्पातचा मजूर कंत्राटदार होता. त्याने बँकेत २.३३ लाख रुपये जमा करण्यासाठी पाठविलेला कामगार जमीदार रेहमान बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जमीदाराचा जंगलात मृतदेह सापडला. सदर मृतदेह धारदार हत्याराने शरीराचे तुकडे करून ते पिशवीत गुंडाळून कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या कुंपणाबाहेर जंगलात टाकण्यात आले होते. त्यानुसार, तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. याच दरम्यान पोलिसांनी कामगाराचा जबाब नोंद केला असता, संशयित मिशान रेहमान आणि संजय पासवान या दोघांनी सदर कुंपणावरून पिशवी फेकल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले असता, त्यांनी कबुली दिली. तसेच संशयित चांदमिया जब्बर याच्या सांगण्यावरून खून केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, सरकारी अभियोक्ता शिवराम पाटील यांनी बाजू मांडत संशयिताने प्रथम जमीदार रेहमान हा बेपत्ता असल्याचे तक्रार दाखल केली होती. तसेच नंतर त्याचा मृतदेह सापडल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रार दाखल केली होती. हा प्रकार म्हणजे तपास भरकटण्याच्या त्याने केलेला प्रयत्न आहे. तसेच इतर मुद्दे मांडून जामीन फेटाळण्याची मागणी केली. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून जामीन अर्ज फेटाळून लावला.

चांदमिया सहा वर्षांपासून कोठडीत

चांदमिया जब्बर याने चारवेळा विविध दावे करून न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले. ते न्यायालयाने फेटाळून लावले. मागील सहा वर्षांपासून तो कोठडीत असून न्यायालयात खटला समाप्त होण्यास विलंब होणार अाहे. तसेच त्याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्याची मागणी केली.