हे माहीत आहे का ? एकेकाळी मुत्सद्देगिरीचे साधन होता गोव्याचा 'मानकुराद'!

जाणून घ्या फळांचा अनभिषिक्त राजा मानकुरादचा पोर्तुगीज काळापासूनचा रंजक इतिहास आणि आतापर्यंतचा प्रवास

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
43 mins ago
हे माहीत आहे का ? एकेकाळी मुत्सद्देगिरीचे साधन होता गोव्याचा 'मानकुराद'!

पणजी: उन्हाळ्याच्या काहिलीत जेव्हा एखादा रसाळ मानकुराद आंबा जिभेवर विरघळतो, तेव्हा तो केवळ एका फळाची चव देत नाही, तर तो गोव्याच्या पाचशे वर्षांच्या इतिहासाचा आणि मुत्सद्देगिरीचा ठेवा आपल्यासमोर उलगडतो. १५१० मध्ये पोर्तुगीजांचे गोव्यात आगमन झाले आणि भारतीय फळांच्या विश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. रामायण, महाभारत आणि बौद्ध साहित्यात आंब्याचा उल्लेख असला तरी, त्याला खऱ्या अर्थाने 'फळांचा राजा' म्हणून जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली ती गोव्याच्या मातीने.


Hapus Mango tasty delight for sweet tooth – Tagged "Origin of Alphonso" –  AlphonsoMango.in


मुत्सद्देगिरीचे 'गोड' साधन

सोळाव्या शतकात गोव्याचे आंबे हे केवळ खाण्याचे फळ नव्हते, तर ते एक महत्त्वाचे राजनैतिक साधन होते. पोर्तुगीज प्रशासनाकडून दख्खनच्या राजघराण्यांना 'हापूस' आंब्यांच्या पेट्या नजराणा म्हणून पाठवल्या जात. विशेषतः मराठा दरबार या आंब्यांचा मोठा शौकीन होता. १७९२ मध्ये पुण्यातील पोर्तुगीज वकील विठ्ठलराव वालावलकर यांनी गोव्याच्या गव्हर्नरला पत्र लिहून सल्ला दिला होता की, महाराष्ट्रात आंब्यांची निर्यात मर्यादित ठेवावी, जेणेकरून या फळाची दुर्मिळता आणि प्रतिष्ठा टिकून राहील. मात्र, याच काळात पेशव्यांनी गोव्यातून हापूसची लाखो कलमे कोकणात नेली आणि तिथूनच जगभर प्रसिद्ध झालेल्या 'रत्नागिरी हापूस'चा जन्म झाला.


undefined


जेसुईट पाद्री आणि 'ग्राफ्टिंग'ची क्रांती

आंब्याच्या विविध जाती निर्माण करण्याचे श्रेय गोव्यातील जेसुईट पाद्रयांना जाते. त्यांनी सोळाव्या शतकात युरोपियन तंत्रज्ञानाचा वापर करून 'ग्राफ्टिंग' (कलम करणे) पद्धत विकसित केली. यामुळेच एकाच झाडापासून दर्जेदार आणि विविध चवींचे आंबे मिळणे शक्य झाले. आज आपण जो 'हिलारियो' आंबा आवडीने खातो, त्याचे नाव शिवोली येथील कलमतज्ज्ञ हिलारियो फर्नांडिस यांच्यावरून पडले आहे, तर 'झेवियर' आंबा सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या नावाशी जोडला गेला आहे.


Mango tree and fruit, 17th century - Stock Image - C029/3006 - Science  Photo Library


मानकुराद: गोव्याची खरी अस्मिता

गोवेकरांच्या मनात मानकुरादचे स्थान अढळ आहे. पोर्तुगीजांनी याचे नाव 'मालकोराडा' (कमी रंगाचा) असे ठेवले होते, पण गोवेकरांनी त्याचे रूपांतर लाडक्या 'मानकुराद'मध्ये केले. या आंब्याचा सुगंध इतका तीव्र असतो की तो संपूर्ण घर दरवळवून टाकतो. केवळ मानकुरादच नाही, तर जाम बनवण्यासाठी वापरला जाणारा 'बार्देश मोन्सेरात', दीर्घकाळ टिकणारा 'फेर्नांदीन' आणि लोणच्यासाठी प्रसिद्ध असलेला 'मालगीश' अशा ८२ हून अधिक जाती आजही गोव्यात टिकून आहेत. गोव्याच्या घराघरात 'चेपणेंची तोरां', 'मिसकुट', 'सांसव' आणि नारळाच्या दुधात शिजवलेला 'आरोश कोको' यांसारखे आंब्याचे पदार्थ संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.


The roots of Goan mangoes


जीआय टॅग: मानकुरादचे जागतिक पुनरुत्थान

पंतप्रधान मोदींच्या 'व्होकल फॉर लोकल' मंत्राला अनुसरत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मानकुरादच्या श्रेष्ठतेचा पुरस्कार केला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०२२ साली पणजीत पार पडलेल्या कृषी मेळाव्यात मानकुराद आंबा हा हापूसपेक्षा चवीला अधिक चांगला आहे, असे विधान केले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तसेच कृषिखात्याने पुढाकार घेऊन गोव्याच्या लाडक्या मानकुराला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी कंबर कसली. 


Pleased to receive the 'Cardozo Mankurad' - a premium selection of Mankurad  mango, the pride of Goa. This Farmers' variety, developed through research  by ICAR-CCARI, Goa, has been officially released by the


१ ऑगस्ट २०२३ हा दिवस मानकुरादसाठी सुवर्णक्षण ठरला. चेन्नई येथील भौगोलिक मानांकन रजिस्ट्रीने गोव्याच्या मानकुराद आंब्याला 'जीआय टॅग' प्रदान केला. हा टॅग मिळाल्यामुळे आता कर्नाटक किंवा इतर राज्यांतील शेतकरी आपल्या आंब्याला 'गोवा मानकुराद' म्हणून विकू शकणार नाहीत. यामुळे गोव्यातील स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण झाले असून, त्यांना जागतिक बाजारपेठेत अधिक चांगला दर मिळणे शक्य होणार आहे. आयसीएआर-सीसीएआरआय (ICAR-CCARI) या संस्थेच्या अथक प्रयत्नांमुळे मानकुरादची विश्वासार्हता सिद्ध झाली. 


State starts process to get Geographical Indication tag for three Goan  mango types | Goa News - Times of India


आरोग्यदायी गुणधर्म आणि चवीची निवड

आरोग्याच्या दृष्टीने आंबे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मानकुराद आपली पचनसंस्था सुदृढ ठेवण्यासाठी आणि जीवनसत्त्वांची गरज पूर्ण करण्यासाठी उत्तम मानला जातो. आंब्यांच्या चवीचा विचार केला तर हा वैयक्तिक आवडीचा भाग आहे. ज्यांना विना-तंतूचा मलाईदार गोडवा आवडतो, त्यांना हापूस, पायरी, मालदा किंवा लंगडा भावतो; पण ज्यांना आंबट-गोड चवीचा आणि तीव्र सुगंधाचा 'अस्सल' अनुभव घ्यायचा असतो, त्यांची पहिली पसंती नेहमी 'मानकुराद'च असते.


हेही वाचा