आर्ट गॅलरीत मुरगावचे मामलेदार कार्यालय !

बायणा रवींद्र भवनातील स्थिती : पालिका इमारतीत कार्यालये हलविण्यास दिरंगाई


10th May, 08:55 pm
आर्ट गॅलरीत मुरगावचे मामलेदार कार्यालय !

आर्ट गॅलरीमध्ये थाटण्यात आलेले मामलेदार कार्यालय.
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : बायणा रवींद्र भवनात साडेचार वर्षे तळ ठोकलेली उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालये पूर्ववत मुरगाव पालिका इमारतीत हलविण्याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने रवींद्र भवनच्या कार्यकारी समितीने ‘सदर जागा कधी सोडणार ?’ असा प्रश्र्न मामलेदारांना विचारला आहे. एकीकडे रवींद्र भवन जागा सोडण्याबाबत दबाव आणत आहे, तर मुरगाव पालिकेकडून जागा देण्याबाबत पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून योग्य मार्ग काढण्याची गरज व्यक्त होत आहे.
मुरगाव पालिका कार्यालय इमारतीच्या दुरुस्ती व नूतनीकरण कामासाठी तळमजल्यावर असलेली मुरगाव उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालये बायणा रवींद्र भवनमध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये हलविण्यात आली होती. रवींद्र भवनच्या आर्ट गॅलरीमध्ये मामलेदार कार्यालय, तर कँटिन व इतर भागात उपजिल्हाधिकारी कार्यालय थाटण्यात आले. त्यामुळे रवींद्र भवनला आर्ट गॅलरीचा वापर करता येत नाही. या ठिकाणी वास्को शहर आरोग्य केंद्राचा कारभारही सुरू करण्यात आला होता. त्यामुळे रवींद्र भवनच्या कामकाजावर परिणाम होऊ लागला होता. याप्रकरणी जयंत जाधव यांनी सतत पाठपुरावा केल्याने आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आरोग्य केंद्राचा कारभार तेथून हलविला. मात्र उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालये तेथेच आहेत.
रवींद्र भवनातील उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालये तेथून हलवावीत यासाठी रवींद्र भवन समिती प्रयत्न करत आहे. सदर कार्यालये थाटून चार वर्षे होत आली. तथापि भाडे म्हणून एक पैसाही दिलेला नाही. याउलट तेथील वीज, पाणी व इतर गोष्टींचा वापर होत असल्याचे समितीचे मत आहे. याप्रकरणी मुरगाव पालिकेने तातडीने लक्ष घालून प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी समितीने केली आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतरही कार्यवाही नाही
मुरगाव पालिका प्रशासकीय कार्यालय इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दोन वर्षांमध्ये मामलेदार व उपजिल्हाधिकारी कार्यालयांना पूर्ववत पालिका इमारतीमध्ये जागा देण्यात आलेली नाही. याप्रकरणी २८ ऑक्टोबरला मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी बोलाविलेल्या बैठकीत चर्चा होऊन १६ डिसेंबरपासून मुरगाव मामलेदार व उपजिल्हाधिकारी कार्यालयांचा कारभार मुरगाव पालिका इमारतीच्या तळमजल्यावरून सुरू करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. परंतु पत्रव्यवहारानंतही कोणताही निर्णय झालेला नाही. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे.
वकील संघटनेच्या निवेदनानंतरही हालचाल नाही
रवींद्र भवनात उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालये थाटल्याने नागरिकांना कामासाठी तेथे जाणे गैरसोयीचे होत आहे. रवींद्र भवनात उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालये हलविल्याने आमच्या अशिलांना तसेच सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी सदर कार्यालये पालिका इमारतीत हलविण्यासंबंधी वास्को वकील संघटनेने आमदार कृष्णा साळकर यांना निवेदन दिले होते.मात्र त्यानंतरही काहीच हालचाल झालेेली नाही.

हेही वाचा