ओकांब येथे दूधसागर नदीत बुडालेल्या आयआयटी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
ओकांब येथे दूधसागर नदीत बुडालेल्या आयआयटी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

पणजी : ओकांब-धारबांदोडा येथील दूधसागर नदीच्या पात्रात रविवारी सायंकाळी बुडालेल्या आयआयटी गोवा (फर्मागुडी) मधील इम्तियाज हुसेन (२१, लडाख) या विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर सोमवारी दुपारी शोध पथकाला सापडला आहे. सुमारे २४ तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर बचाव पथकाने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. 

रविवारी दुपारी सुटीचा आनंद घेण्यासाठी आयआयटीच्या आठ विद्यार्थ्यांचा गट ओकांब येथे गेला होता. नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले असताना, पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने इम्तियाज अचानक प्रवाहात ओढला गेला. सोबतीला असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. यानंतर फोंडा पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. रविवारी रात्री अंधार पडेपर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली होती, परंतु मृतदेह सापडला नव्हता.

सोमवारी सकाळी धारबांदोडाचे उपजिल्हाधिकारी अमितेश शिरवोईकर आणि मामलेदार मनोज कोरगावकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून शोधकार्याचा आढावा घेतला. फोंडा पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा दलाच्या जवानांनी बोटींच्या साहाय्याने शोधमोहीम पुन्हा सुरू केली. अखेर दुपारी  नदीच्या पात्रातून इम्तियाजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, या घटनेने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नद्या आणि धबधब्यांच्या ठिकाणी बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रशासनाने तेथे प्रवेश बंदी केली आहे. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून तरुण अशा ठिकाणी मौजमजेसाठी जात असल्याने जीवितहानी होत आहे. अशा ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे.

हेही वाचा