वसईत लग्नाचा मांडव बनला रणांगण; वधू-वर पक्षांत हाणामारी

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
51 mins ago
वसईत लग्नाचा मांडव बनला रणांगण; वधू-वर पक्षांत हाणामारी

वसई : आनंदाचा सोहळा असलेल्या एका विवाह समारंभाचे रूपांतर काही वेळातच रणांगणात झाल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. वधू आणि वर पक्षांतील वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या आणि बेदम मारहाण केली. या घटनेचा थरार सोशल मीडियावर 'लाईव्ह' व्हायरल झाला असून, याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी दोन्ही बाजूंवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचा मुख्य विधी पार पडल्यानंतर लगेचच दोन्ही पक्षांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले. लग्नाच्या मांडवातच दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांवर प्लास्टिकच्या खुर्च्या भिरकावल्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या तुंबळ हाणामारीत अनेक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या राड्यानंतर दोन्ही पक्षांनी माणिकपूर पोलीस ठाणे गाठून एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. वर पक्षाने मारहाणीची तक्रार दाखल केली आहे, तर वधू पक्षाने 'पोक्सो' अंतर्गत अत्यंत गंभीर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत दोन्ही बाजूंच्या काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

लग्नातील या हाणामारीचा व्हिडीओ काही लोकांनी सोशल मीडियावर लाईव्ह प्रसारित केला होता. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, पोलिसांनी हा डिजिटल पुरावा तपासासाठी ताब्यात घेतला आहे. आम्ही घटनेचा सखोल तपास करत असून व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस आता या वादाचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.


हेही वाचा