माळरानात गुरे चरायला घेऊन गेलेल्या एकावर अस्वलाचा जीवघेणा हल्ला!

गोवा-कर्नाटक सीमाभागातील जोयडा येथील घटना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20 mins ago
माळरानात गुरे चरायला घेऊन गेलेल्या एकावर अस्वलाचा जीवघेणा हल्ला!

जोयडा: कर्नाटक-गोवा सीमेलगत असलेल्या जोयडा तालुक्यात वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. तालुक्यातील नागोडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोलगद्दा येथे रविवारी सायंकाळी अस्वलाने एका गुराख्यावर  केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, सध्या सरकारी रुग्णालयात त्यांचावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलगद्दा येथील रहिवासी नावू विठो पाटील हे नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी आपल्या म्हशींना चारा पाणी करून पुन्हा घरी आणण्यासाठी जंगलाच्या दिशेने गेले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास, जंगलाच्या जवळ पोहोचले असता झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. काही कळण्याच्या आतच अस्वलाने त्यांच्या पायाचा चावा घेतला, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

नावू पाटील यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्याने आसपासच्या शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. लोकांचा आवाज ऐकून अस्वल जंगलात पळून गेले. ग्रामस्थांनी गंभीर जखमी नावू पाटील यांना तातडीने जोयडा येथील सरकारी आरोग्य केंद्रात हलविले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. येथील स्थानिकांत मात्र या घटनेमुळे धास्ती पसरली आहे. 

जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, वनाधिकाऱ्यांनी या भागात तातडीने गस्त घालून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. वन्यप्राण्यांच्या या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि पशुपालकांचे शेतात जाणेही कठीण झाले असून, प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे.

हेही वाचा